जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी कामगारांना भरपगारी सुट्टी! कुणाकुणाचा समावेश?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे.
मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.
कुणाकुणाला सुट्टी मिळणार?
यानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल. यात खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, माल्स, रिटेलर्स आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.
advertisement
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
कुठे कुठे निवडणूक?
advertisement
सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये रायगड (पंचायत समित्या - पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर); रत्नागिरी (मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर); सिंधुदुर्ग (वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग); पुणे (जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर); सातारा (खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड); सांगली (आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज); सोलापूर (करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट); कोल्हापूर (शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड); छत्रपती संभाजीनगर (सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण); परभणी (जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड); धाराशीव (परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा) आणि लातूर (पंचायत समित्या - अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा) यांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 4:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी कामगारांना भरपगारी सुट्टी! कुणाकुणाचा समावेश?









