अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकपदी नियुक्ती
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालक पदावर नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती 1 मे 2025 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल.
मुंबई: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालक (Whole-Time Director) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी संचालकपदाचा निर्णय घेतला. आतापर्यंत अनंत अंबानी रिलायन्सच्या संचालक मंडळावर नॉन-एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. आता ते अधिक जबाबदारीची आणि सक्रिय कार्यकारी भूमिका स्वीकारणार आहेत.
ही नियुक्ती 1 मे 2025 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल आणि ती शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर अमलात येईल, असे कंपनीने शेअर बाजारात सादर केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. अनंत अंबानी हे रिलायन्स समूहाच्या विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. ते मार्च 2020 पासून जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड, मे 2022 पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि जून 2021 पासून रिलायन्स न्यू एनर्जी व रिलायन्स न्यू सोलर एनर्जी या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
सप्टेंबर 2022 पासून ते रिलायन्स फाऊंडेशनच्या संचालक मंडळावरही सदस्य आहेत. त्यामुळे कंपनीच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा अनुभव आहे. शिक्षणाच्या बाबतीत अनंत अंबानी यांनी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. त्यांना प्राणी कल्याणाबाबत विशेष आस्था आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे अपंग, वृद्ध आणि असहाय प्राण्यांसाठी पुनर्वसन, संगोपन व सन्मानाने जीवन जगण्याची व्यवस्था उभी केली आहे.
advertisement
अनंत अंबानी यांचे मोठे भाऊ आकाश अंबानी आणि बहीण ईशा अंबानी हे देखील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर नॉन-एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स म्हणून कार्यरत आहेत. आकाश अंबानी सध्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आहेत, तर ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अशा प्रकारे अंबानी कुटुंबातील पुढील पिढी आता कंपनीच्या नेतृत्वात ठामपणे पावले टाकत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 26, 2025 11:47 AM IST