Paytm वॉलेटमधील पैशांचं 29 फेब्रुवारीनंतर काय होणार? RBI ने दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
आता बँकेला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. आरबीआयने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सांगितलं की, व्यापाऱ्यांसह ग्राहकांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे पेटीएम पेमेंट्स बँक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडसाठी (पीपीबीएल) एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आयबीआय) बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी आणखी 15 दिवस दिले आहेत. या पूर्वी आरबीआयने पीपीबीएलला 29 फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. आता बँकेला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. आरबीआयने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सांगितलं की, व्यापाऱ्यांसह ग्राहकांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआयने जारी केलेल्या स्टेटमेंटनुसार, 15 मार्च 2024 नंतर पीपीबीएलला कोणत्याही ग्राहक खात्यांमध्ये, प्रीपेड साधने, वॉलेट्स, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादींमध्ये आणखी कोणत्याही प्रकारच्या ठेवी, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स किंवा टॉप अपला परवानगी दिली जाणार नाही.
मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीनुसार, वाढून दिलेल्या मुदतीमध्ये पेटीएम ग्राहक आपापली बचत खाती, चालू खाती, प्रीपेड साधने, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादींमधील शिल्लक रक्कम कोणत्याही निर्बंधाशिवाय काढू किंवा वापरू शकतील.
advertisement
एम. दामोदरन यांच्या नेतृत्वाखाली पेटीएमने स्थापन केली सल्लागार समिती
9 फेब्रुवारीला पेटीएमने सांगितलं होतं की, मार्केट रेग्युलेटरी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) माजी अध्यक्ष एम. दामोदरन यांच्या नेतृत्वाखाली एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती नियमांचे पालन आणि नियमन याबाबत कंपनीला सल्ला देईल. तीन सदस्यांच्या या समितीमध्ये इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) माजी अध्यक्ष एम. एम. चितळे आणि आंध्र बँकेचे माजी सीएमडी आर. रामचंद्रन यांचा समावेश आहे.
advertisement
या पूर्वी, कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी व्हर्च्युअल टाउन हॉलमध्ये माहिती दिली होती की, सध्याची समस्या सोडवण्यासाठी आरबीआय आणि इतर बँकांशी बोलणी सुरू आहे. कंपनी आणि बँकेवरील संकट लवकरच दूर होईल, असंही ते म्हणाले होते.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) मते, डिसेंबर 2023मध्ये इतर बँकांच्या तुलनेत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) युपीआयचा सर्वात जास्त लाभ घेणारी बँक होती. डिसेंबरमध्ये ग्राहकांनी पेटीएम पेमेंट बँक ॲपवर 16 हजार 569.49 कोटी रुपयांचे 144.25 कोटी ट्रान्झॅक्शन्स केले होते. पेटीएमचा भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट (बीबीपीओयू) व्यवसाय देखील पीपीबीएल अंतर्गत येतो. ही सेवा वीज, पाणी, शाळा आणि विद्यापीठ शुल्क यांसारखी बिल भरण्याची सुविधा प्रदान करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2024 3:13 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Paytm वॉलेटमधील पैशांचं 29 फेब्रुवारीनंतर काय होणार? RBI ने दिली महत्त्वाची माहिती









