Women Success Story: छोट्या स्टॉलपासून सुरूवात, आज वडापाव सेंटर, महिलेची महिन्याला 1 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
पडेगाव येथे एका छोट्या स्टॉलपासून वनिता जगताप या महिलेने वडापाव व्यवसायाची सुरुवात केली होती. या व्यवसायाच्या माध्यमातून त्या खर्च वजा करून 1 लाख रुपये महिन्याला कमाई करत आहेत
छत्रपती संभाजीनगर : पडेगाव येथे एका छोट्या स्टॉलपासून वनिता जगताप या महिलेने वडापाव व्यवसायाची सुरुवात केली होती. गेल्या 10 वर्षांपासून त्या व्यवसायात आहेत. वेळेनुसार बदल करत, स्टॉलपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजच्या घडीला माई वडापाव सेंटरपर्यंत पोहोचला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्या खर्च वजा करून 1 लाख रुपये महिन्याला कमाई करत आहेत, तसेच त्यांच्याकडे 6 कामगार आहेत. त्यांना देखील रोजगार उपलब्ध झाल्याने ते देखील समाधान व्यक्त करत आहेत. सध्या या वडापाव सेंटरच्या माध्यमातून 10 जण आपला उदरनिर्वाह भागवत आहेत, असे माई वडापाव सेंटर संचालिका जगताप यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
माई वडापाव सेंटरसाठी बाहेरचे मसाले न वापरता घरी तयार केलेले मसाले वापरले जातात. तसेच दररोज मसाले तयार होतात आणि सकाळी 5 वाजल्यापासून बटाटे उकडण्याचे या सेंटरचे काम सुरू होते. दिवसभरात 1 हजार वडापाव या ठिकाणी विकले जातात. एक वडापाव येथे 15 रुपयांना मिळतो. त्या वडापाव सोबत शेंगदाणे व लाल मिरची चटणी देखील दिली जाते, त्यामुळे या ठिकाणी नेहमी ग्राहकांची वर्दळ होत असते. हे वडापाव सेंटर पडेगाव येथे नाशिक रस्त्यावर असून या ठिकाणाहून वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद या ठिकाणी पर्यटक आणि भाविक फिरायला जात असतात. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना सर्वजण या ठिकाणी नाश्ता करतात.
advertisement
आमच्या वडापाव सेंटरवर एका ग्राहकाने एकदा वडापाव खाल्ला की, ते ग्राहक दुसऱ्या वेळेसही तितक्याच आवडीने खातात व वडापावचे गुणही गातात. त्यामुळे क्वालिटी टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. व्यवसाय करताना अनेक अडचणी येतात; मात्र त्यावर मात करून आपले काम सुरू ठेवावे लागते. तसेच कोणताही व्यवसाय मन लावून केला आणि त्यात सातत्य ठेवले, तर नक्कीच यश मिळते, असे देखील जगताप यांनी म्हटले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 27, 2025 10:44 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: छोट्या स्टॉलपासून सुरूवात, आज वडापाव सेंटर, महिलेची महिन्याला 1 लाख कमाई