तेच विमान, तोच पॅटर्न...अजित पवारांसारख्या बॉम्बार्डियर-४५ विमानाचा ३ वर्षांपूर्वी असाच झाला होता अपघात,काय होते त्याचे संकेत?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. मुंबईहून पुणे जिल्ह्यातील बारामतीकडे जात असताना त्यांच्या खाजगी विमानाला अपघात झाला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघातग्रस्त विमान हे बॉम्बार्डियर कंपनीचे ‘लिअरजेट-४५’ मॉडेल असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघाताची चौकशी सुरू असतानाच विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून २०२३ मध्ये घडलेल्या एका तत्सम घटनेची आठवण करून दिली जात आहे. तीन वर्षांपूर्वी याच प्रकारच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता, मात्र त्या वेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
२०२३ मधील अपघात नेमका काय होता?
१४ सप्टेंबर २०२३ रोजी बॉम्बार्डियर लिअरजेट-४५XR या मॉडेलचे एक खाजगी विमान अपघातग्रस्त झाले होते. हे विमान विशाखापट्टणमहून मुंबईकडे येत होते. या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-DBL होता, तर अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा क्रमांक VT-SSK असल्याचे सांगितले जात आहे. त्या वेळी विमानात एकूण सहा प्रवासी होते आणि उड्डाण सुरळीत पार पडले होते.
advertisement
लँडिंगदरम्यान घडलेला गंभीर प्रकार
मुंबई विमानतळावर संध्याकाळी सुमारे ५ वाजता लँडिंगसाठी विमानाला परवानगी देण्यात आली होती. मात्र उतरताना विमान धावपट्टीवर नियंत्रण गमावून बाहेर घसरले. या घटनेला ‘रनवे एक्सकर्शन’ असे संबोधले जाते. अपघातानंतर विमानाचा एक पंख तुटला, मुख्य भागाला मोठे नुकसान झाले आणि आगीने पेट घेतला. विमानतळावरील अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणली.
advertisement
तपास अहवालात काय निष्पन्न झाले होते?
विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) दिलेल्या माहितीनुसार, त्या घटनेमागे खराब हवामान हे मुख्य कारण होते. मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि ढगाळ वातावरणामुळे लँडिंग करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. फ्लाइट ट्रॅकिंग संस्थांच्या अहवालांनीही त्या वेळी हवामान अतिशय प्रतिकूल असल्याचे स्पष्ट केले होते. यांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक याबाबत ठोस निष्कर्ष नोंदवण्यात आले नव्हते.
advertisement
देशभरातून शोक व्यक्त
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्रासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते राज्यातील प्रभावी आणि अनुभवी नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी शोकसंदेश व्यक्त केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारकडून तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 2:38 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
तेच विमान, तोच पॅटर्न...अजित पवारांसारख्या बॉम्बार्डियर-४५ विमानाचा ३ वर्षांपूर्वी असाच झाला होता अपघात,काय होते त्याचे संकेत?









