devendra fadnavis: देवेंद्र फडणवीस कसं करणार डॅमेज कंट्रोल? काय आहे मिशन विधानसभेचा प्लॅन?
- Published by:sachin Salve
Last Updated:
'मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, असं मी म्हटलं तेव्हा निराशेतून म्हटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. आम्ही लढणारे आहोत'
राहुल झोरी, प्रतिनिधी
4 जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. राज्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली. महायुतीलाही म्हणावं असं यश आलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांच्या समोर गेले. त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. नंतर त्यांनी दिल्ली वारी केली. फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. भाजप कार्यकर्ते आणि फडणवीस समर्थकांमधील संभ्रमाचं वातावरण दूर झालं. शहांच्या भेटीनंतर फडणवीस मुंबईत परतले. इथं त्यांनी आमदार मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या विजयासाठीचं गणित त्यांनी मांडलं.
advertisement
अपयशाची जबाबदारी
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पैकी महायुतीने फक्त 17 जागा स्वतःकडे राखल्या. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. त्यांनी 31 जागा मिळावल्या. महायुतीतील बलाढ्य नेत्यांसाठी हा पराभव पचवणं कठीण जाईल हे निश्चित मानलं जातं होतं. मात्र, निकाल उलटे लागते असताना फडणवीस माध्यमांमसमोर आले. त्यांनी पत्रकार परिषद घेत पराभवाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषदेतच मंत्रिपदावरून मोकळं करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेमागचे अंदाज लावले जात होते. अशात फडणवीसांनी आमदार मेळाव्यात स्पष्टता दिलीये. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यामागची रणनीती त्यांनी स्पष्ट केली. भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात आमदार मेळावा पार पडला. "यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं. ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. भाजपचं नेतृत्व मी करत होतो. म्हणून अपयशाची जबाबदारी माझी आहे हे मी सांगितलं. तुम्ही सर्वांनी उत्तम काम केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आपण कमी पडलो. कसं पडलो हे मी सांगितलंच आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
advertisement
लढण्याचा निर्धार
फडणवीसांनी स्पष्ट शब्दात पराभवाचा वचपा विधानसभा निवडणूकीत काढणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, असं मी म्हटलं तेव्हा निराशेतून म्हटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. आम्ही लढणारे आहोत. चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. कुणाला वाटलं असेल मी निराश झालो किंवा भावनेच्याभरात राजीनाम्याचं बोललो असं नाही. माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती. त्यावर मला काम करायचं होतं. अमित शाह यांना मी भेटलो. त्यांनाही मी माझ्या डोक्यात काय हे सांगितलं. पण सध्या ही वेळ नसल्याचं अमित शाह म्हणाले. आपण नंतर एकत्र बसून महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करू असं शाह म्हणाले," अशी माहिती देतानाच निवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. एक मिनिटंही मी शांत बसणार नाही. आता मी काम करत आहे. करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
advertisement
नवी रचना
फडणवीसांनी नव्याने आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कंबर कसलीये. पराभवाची कारणं शोधून त्यावर काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. आमदार मेळाव्यात त्यांनी सांगितलं की, "मोदींच्या यशात 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. यावेळी तो वाटा उचलू शकलो नाही. या निवडणुकीत काही गणितं चुकली. त्यामुळेच नव्याने पुनरावलोकन व्हावं आणि नवीन स्ट्रॅटेजी यावी म्हणून बैठक घेतली. आपण निर्धार केलाय जे अपेक्षित यश आलं नाही, त्याची कारणं शोधून ती दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा निर्धार व्यक्त केला आहे. उन्हाळा संपतो, काहीली संपलीय. आता पाऊस पडत असताना जे पेरलं जातं तेच उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे," असं फडणवीस म्हणाले.
advertisement
फडणवीसांची ताकद वाढलीये?
राज्यात महायुतीला फटका बसण्याचं कारण मराठा आंदोलनाला दिलं जातं. मराठा समाजाने विरोधी महाविकास आघाडीला कौल दिला. मराठावाड्यातील सातही खासदार मराठा समाजाचे आहे. जरांगेंनी आपले ते निवडून आणा बाकीचे पाडा हा संदेश दिला होता. मराठा समाजाने त्याला प्रतिसाद दिला. मराठा आंदोलनात फडणवीसांवर वैयक्तिक टीका करण्यापर्यंत जरांगे गेले होते. फडणवीसांना हटवल्यास जरांगे फॅक्टर न्युट्रल करता येईल, असा विचार ही भाजपच्या शीर्ष नेतृत्त्वाला करता आला असता. मात्र त्यांनी फडणवीसांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. राज्यातील सध्याचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी फडणवीसांचं नेतृत्त्व कौशल्य आहे, ही बाब अधोरेखित झाल्याचं दिसून आलंय. असं मत फडणवीस समर्थक व्यक्त करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 08, 2024 10:39 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
devendra fadnavis: देवेंद्र फडणवीस कसं करणार डॅमेज कंट्रोल? काय आहे मिशन विधानसभेचा प्लॅन?