Indian Railway : प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे स्थानकांवरील तपासणी प्रक्रिया होणार कडक; जाणून घ्या कोणते नवे नियम लागू
Last Updated:
Railway Update : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवे नियम लागू केले आहेत. रेल्वे स्थानकांवर बॅग तपासणी, ओळखपत्र पडताळणी आणि सुरक्षाव्यवस्था आणखी कडक होणार आहेत.
मुंबई : मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सामानांच्या तपासणीच्या नावाखाली रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांकडून उघडपणे पैसे उकळल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाला आळा घालण्यासाठी नवे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आले आहेत. यासंदर्भात राजकीय रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांनी अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. बैठकीत प्रवाशांच्या सामान तपासणीची प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियमबद्ध राहावी, तसेच पोलिसांवर होणारा अविश्वास दूर व्हावा यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या नव्या निर्णयांनुसार सर्व स्थानकांवरील तपासणी प्रक्रियेवर अधिक कडक नियम लागू होणार आहेत.
कोणते नियम लागू...?
सर्वप्रथम, सामान तपासणी केवळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक किंवा संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच होईल. कोणत्याही परिस्थितीत कनिष्ठ अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तींना अशी जबाबदारी दिली जाणार नाही.तसेच सामानांची तपासणी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली प्रक्रिया केली जाईल आणि संपूर्ण तपासणीची नोंद व्हिडिओ स्वरूपात ठेवली जाईल. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यरत नाही किंवा सुनसान जागा असेल तेथे कोणतीही तपासणी होणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
advertisement
तपासणीसाठी नेमण्यात आलेले सर्व पोलिस कर्मचारी वर्दीमध्ये असणे बंधनकारक आहे. कोणताही पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये ड्युटी बजावताना दिसल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रभारी अधिकाऱ्यावर येईल. त्याचबरोबर होमगार्ड, एमएसएफ किंवा खाजगी व्यक्तींना प्रवाशांचे सामान तपासणीसाठी नियुक्त करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तपासणीमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ड्युटी दर पंधरा दिवसांनी बदलली जाईल, तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बदली दर तीन महिन्यांनी केली जाईल. यामुळे एका ठिकाणी दीर्घकाळ एकाच कर्मचाऱ्याचे नियंत्रण राहणार नाही आणि संभाव्य गैरव्यवहाराला आळा बसेल.
advertisement
होमगार्ड किंवा पोलिस कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी होणाऱ्या दुर्वर्तनाच्या घटनांना आळा घालण्यासाठी देखील प्रभारी अधिकारी जबाबदार असतील. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून सर्व अधिकारी सजग राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
तसेच, सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना आपल्या क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संपूर्ण माहिती 10 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, संशयास्पद वाटणाऱ्या होमगार्ड, पोलिस कर्मचारी किंवा जीआरपीतील कर्मचाऱ्यांची यादी 19 सप्टेंबर 2025 पर्यंत अनिवार्यपणे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य मिळेल आणि तपासणी प्रक्रियेबाबत पारदर्शकता निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 1:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Indian Railway : प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे स्थानकांवरील तपासणी प्रक्रिया होणार कडक; जाणून घ्या कोणते नवे नियम लागू