MHADA Lottery: बाप्पा पावणार! घराचं स्वप्न साकार होणार, ठाणे ते ओरोस म्हाडाच्या 5285 घरांसाठी सोडत
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
MHADA Lottery: हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 5285 घरे आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर झाली आहे.
मुंबई: मुंबईसह ठाणे परिसरात हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. आता हेच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केलीये. विशेष म्हणजे यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. या घरांच्या किमती 25 ते 60 लाख रुपयांपर्यंत असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
कोकण मंडळाने 5 हजार 285 घरांसाठी सोडत जाहीर केली असून इच्छुकांना सोमवारपासून अर्ज करता येतील. घरांची संगणकीय सोडत 3 सप्टेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होईल. या घरांसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीसाठी देखील सोडत जाहीर केली आहे.
advertisement
5 घटकांमध्ये सोडत
कोकण मंडळातर्फे जाहीर केलेली सोडत पाच घटकांत विभागलेली आहे. यामध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीत या योजेअंतर्गत 1677 आणि 50 टक्के परवडणाऱ्या योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इच्छुकांना म्हाडाच्या https:// housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येईल.
advertisement
कसे असेल वेळापत्रक?
घरांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ सोमवारी दुपारी 1 वाजता होईल. इच्छुक 13 ऑगस्ट रोजी 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज तर 14 ऑगस्टला रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कम भरू शकतील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी 21 ऑगस्ट तयार केली जाईल, तर स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 1 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. 3 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2025 9:26 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery: बाप्पा पावणार! घराचं स्वप्न साकार होणार, ठाणे ते ओरोस म्हाडाच्या 5285 घरांसाठी सोडत