Mumbai Local: महाशिवरात्रीलाच लोकलचा खोळंबा, मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून लोकलचं वेळापत्रक पाहूनच दोन दिवसात घर सोडावं लागेल. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई: व्हॅलेंटाईन डे आणि महाशिवरात्रीलाच मुंबईकरांचा खोळंबा होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने देखभाल व दुरुस्तीची विविध कामे हाती घेतली असून रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा तसेच अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, खारबाव येथे शनिवारी प्रस्तावित रात्रकालीन मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे – मुख्य मार्ग
माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 या वेळेत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा येथे धिम्या मार्गावर वळवून मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर आणण्यात येतील. तसेच ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे धिम्या मार्गावर वळवून माटुंगा येथे पुन्हा जलद मार्गावर सोडण्यात येतील.
advertisement
हार्बर मार्ग
कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान सुटणाऱ्या वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल तसेच पनवेल, बेलापूर व वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी किंवा नेरुळदरम्यान प्रवास करण्यास परवानगी असेल.
advertisement
पश्चिम रेल्वे
राम मंदिर ते बोरिवलीदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत बोरिवली ते अंधेरीदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल धिम्या आणि सहाव्या मार्गिकेवर चालवण्यात येतील तर पाचव्या मार्गिकेवरील लोकल डाऊन जलद मार्गावर चालतील. काही लोकल रद्द होतील तर काही सेवा गोरेगावपर्यंतच मर्यादित राहतील.
रात्रकालीन ब्लॉक
विक्रोळी ते मुलुंडदरम्यान शनिवारी रात्री 1.05 ते पहाटे 4.35 दरम्यान ब्लॉक असेल. या काळात रात्री 12.24 ची सीएसएमटी-ठाणे आणि पहाटे 4.04 ची ठाणे-सीएसएमटी लोकल रद्द राहतील. रात्री 12.12 ची सीएसएमटी-कर्जत लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. काही स्थानकांवर थांबे रद्द असल्याने प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 7:55 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: महाशिवरात्रीलाच लोकलचा खोळंबा, मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं?









