मुंबईत गाडी कुठं लावायची? नो टेन्शन! घरातून बाहेर पडण्याआधीच बूक करा आणि बिनधास्त राहा, पाहा कसं?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Parking: मुंबईत तुम्ही जिथे कुठे जाणार असाल, तिथे तुमच्या गाडीची पार्किंगची जागा घरबसल्या मोबाईलवरूनच बुक करू शकणार आहात.
मुंबई : महानगरी मुंबईत वाहतूककोंडीचा प्रश्न आधीच गंभीर आहे. पण त्याहून मोठं टेन्शन अनेकदा गाडी पार्किंगचं असतं. कुठेही गेलं की ‘गाडी कुठे लावायची?’ हा प्रश्न हमखास उभा राहतो. मात्र, आता या मोठ्या समस्येवर तोडगा निघणार आहे. कारण आता तुम्ही जिथे कुठे जाणार असाल, तिथे तुमच्या गाडीची पार्किंगची जागा घरबसल्या मोबाईलवरूनच बुक करू शकणार आहात. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात या महत्त्वाच्या प्रश्नावर उपाय जाहीर करण्यात आला आहे. लवकरच एक खास मोबाइल अप सुरू करण्यात येणार आहे. नेमका हा प्रकल्प काय आहे? ॲप कसा असणार आहे आणि महापालिकेची योजना काय आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
अर्थसंकल्पात काय सांगितले?
महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्मार्ट वाहनतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि पार्किंगच्या कमतरतेमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होते. यामुळे वाहतूककोंडी आणखी वाढते. हीच समस्या लक्षात घेऊन महापालिकेने स्मार्ट पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबवला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही हिस्सा महापालिकेला मिळणार आहे.
advertisement
कसा असणार स्मार्ट पार्किंग ॲप?
या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मोबाइल ॲप. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जवळपास असलेल्या पार्किंगची माहिती मिळेल. कोणत्या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहे, किती वेळेसाठी बुकिंग करता येईल, तसेच किती शुल्क आकारले जाणार आहे याची माहिती अॅपवर मिळेल. नागरिकांना ठराविक वेळेसाठी पार्किंगची जागा आगाऊ आरक्षित करता येईल. त्यामुळे पार्किंगसाठी रस्त्यावर फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
advertisement
किती आणि कुठे उभारली जाणार वाहनतळे?
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 530 नवीन वाहनतळे उभारली जाणार आहेत. पुढील टप्प्यात ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट वाहनतळांचाही समावेश करण्यात येणार आहे. सध्या शहरात 65 ठिकाणी सशुल्क वाहनतळे उपलब्ध असून त्यांची एकूण क्षमता 8258 वाहनांची आहे. तसेच 37 ठिकाणी सार्वजनिक पार्किंग प्रकल्पांसाठी प्रक्रिया सुरू असून या वाहनतळांची एकूण क्षमता 27679 वाहनांची असणार आहे.
advertisement
भूमिगत वाहनतळाची मोठी योजना
दरम्यान, दादर येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात सौंदर्यीकरणासह विकासकामे तीन टप्प्यांत केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात येथे दोन मजली भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासोबतच फुटपाथ व्यवस्थेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसीअंतर्गत शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील विद्यमान फुटपाथची सुधारणा केली जाणार आहे. पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित, प्रशस्त आणि दिव्यांगांसाठी सुलभ पदपथ तयार करण्यात येणार आहेत. यामुळे रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग कमी होऊन पादचारी सुरक्षाही वाढेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 9:22 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत गाडी कुठं लावायची? नो टेन्शन! घरातून बाहेर पडण्याआधीच बूक करा आणि बिनधास्त राहा, पाहा कसं?










