शून्यातून विश्व! खाद्य व्यवसायात तुषार जाधवची गगनभरारी; वर्षाला कमावतोय हजारोंचा नफा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
अंबरनाथमधील युवा उद्योजक तुषार जाधव यांनी आपल्या जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाद्य व्यवसायात यश मिळवत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नोकरीच्या मर्यादेत न राहता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वप्नांची उंच भरारी घेतली आहे.
अंबरनाथमधील युवा उद्योजक तुषार जाधव यांनी आपल्या जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाद्य व्यवसायात यश मिळवत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नोकरीच्या मर्यादेत न राहता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वप्नांची उंच भरारी घेतली आहे. एमबीए (फायनान्स) पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तुषार यांनी दोन वर्षे टॅक्स कन्सल्टंट म्हणून आणि त्यानंतर दीड वर्ष मुंबईमध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोकरी केली. नोकरी करून केवळ घर चालवता येईल पण आपली स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत असं तुषार यांना सतत वाटत होतं.
व्यवसायात उतरण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर नोकरीला रामराम करून तुषार यांनी फूड इंडस्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला. अनुभव नसणे, भांडवलाची अडचण, जागेची निवड अशा अनेक आव्हानांवर मात करत तुषार यांनी कुटुंबीय आणि मित्र हर्षल पाटील यांच्या मदतीने आपल्या स्वप्नांना आकार दिला. डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी बदलापुरात ‘मिस्टर प्राजी’ या नावाने फास्ट फूड रेस्टॉरंट सुरू केलं. येथे सोया चाप, तंदूर मोमोज, पनीर टिक्का, मशरूम टिक्का आणि रोल्स अशा आगळ्या-वेगळ्या चवीच्या पदार्थांनी खवय्यांची मनं जिंकली.
advertisement
काही महिन्यांतच या रेस्टॉरंटला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि फक्त दोन वर्षांत तुषार यांचा व्यवसाय चांगला स्थिरावला. आज त्यांच्या या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचा नफा मिळतो. याच यशाच्या बळावर तुषार यांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून अंबरनाथमध्ये ‘बेन्ने अँड को’ नावाने साऊथ इंडियन स्टाईल बँगलोर डोसा सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. अंबरनाथमध्ये विविध भाषिकांसह दाक्षिणात्य लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने या नव्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. तुषार जाधव यांची कथा म्हणजे जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांचं प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी दाखवून दिलं आहे की स्वप्नं मोठी असावीत आणि प्रयत्न प्रामाणिक असावेत मग यश नक्कीच आपल्या पावलांशी येतं.
Location :
Badlapur,Thane,Maharashtra
First Published :
October 27, 2025 3:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
शून्यातून विश्व! खाद्य व्यवसायात तुषार जाधवची गगनभरारी; वर्षाला कमावतोय हजारोंचा नफा

