अखेर सुनेत्रा पवारांनी निर्णय घेतलाच! 'त्या' 'सुत्रधाराला' दाखवला बाहेरचा रस्ता, राष्ट्रवादीच्या गोटातला मोठा निर्णय
- Published by:Sachin S
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार , सुनिल तटकरे आणि नरेश अरोरा यांच्यात बैठक झाली.
मुंबई: राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या वाद आणि चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असून चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या लाडकी बहिण कॅम्पेन आणि इतर राजकीय कार्यक्रमाचे रणनीतीकार नरेश अरोरा यांचा अखेर पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार , सुनिल तटकरे आणि नरेश अरोरा यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये डिझाईन बॅाक्सचे नरेश अरोरा यांच्या कंपनीला कंत्राट देण्यावरून बराच वाद झाला.डिझाईन बॅाक्सचे नरेश अरोरा यांना पुन्हा काम देऊ नये असा सूर बैठकीत सगळ्या नेत्यांनी लगावला होता.
advertisement
अजित पवार यांच्या निधनानंतर नरेश अरोरा यांनी पक्षातील स्वत:चे महत्व स्ट्रटेजिस्ट पलिकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यातून नाराज झालेल्या पक्षातील अनेक नेत्यांनी आता पुन्हा नरेश अरोरांना संधी देऊ नका, अशी भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर अजित पवार यांच्या हयातीत सुद्धा पक्षातील वरिष्ठ नेते नरेश अरोरा यांच्यावर नाराज होते.
advertisement
अखेरीस अजितदादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरांचं कंत्राट आता संपुष्टात आल आहे. नरेश अरोरांचं कंत्राट पुन्हा दिलं जाणार नाही. असा निर्णय सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवारांच्या पहिल्या कोअर कमिटीच्या बैठकीतही झाला होता वाद
दरम्यान, सुनेत्रा पवार जेव्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. या बैठकीत नरेश अरोरा यांनी काही कल्पना सुचवल्या होत्या, त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अरोरा यांना बैठकीतून बाहेर जावं लागलं. पुढे ते सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला गैरहजर होते.
advertisement
कोण आहे नरेश अरोरा?
नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही कंपनी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसाठी काम करत आहे. अजित पवारांच्या सभांचे नियोजन करणे, अजित पवारांची प्रतिमा जनमानसात कशी जावी यासाठी धोरण ही कंपनी आखण्याचे काम केलं होतं. अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या कंपनीचा मोठा वाटा आहे. पुणे पालिका निवडणुकीच्या काळात अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रान्चने धडक दिली होती. त्यानंतर अजित पवारांनी या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असं स्पष्ट केलं होतं. तसंच नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी होती. पण, नंतर नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये वाद पेटला आणि आज त्याचा शेवट झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 9:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
अखेर सुनेत्रा पवारांनी निर्णय घेतलाच! 'त्या' 'सुत्रधाराला' दाखवला बाहेरचा रस्ता, राष्ट्रवादीच्या गोटातला मोठा निर्णय








