दीड तासाचा प्रवास 15 मिनिटांत, गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला आजच सुरुवात, ठाणे ते बोरिवली सुसाट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवासासाठी 60 ते 90 मिनिटे लागतात. मात्र बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा वेळ फक्त 15 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
ठाणे: ठाणे आणि बोरीवलीदरम्यान प्रस्तावित दुहेरी बोगदा प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. आजपासून औपचारिक खोदकामाला सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. दीर्घकाळ चर्चेत असलेल्या या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या बोगद्याच्या खोदकामासाठी ‘नायक’ नावाचे अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरले जाणार आहे. विशेष म्हणजे कठीण खडकांमधून सुरक्षित आणि जलद गतीने बोगदा खोदण्याची क्षमता असलेले हे देशातील एकमेव सिंगल शिल्ड हार्ड रॉक मशीन मानले जाते. पुढील टप्प्यात ‘अर्जुन’ नावाचे दुसरे मशीनही या कामात सामील होणार आहे.
advertisement
ठाणे ते बोरीवली हा सुमारे 11.84 किलोमीटर लांबीचा बोगदा संजय गांधी नॅशनल पार्क यांच्या खालील भागातून जाणार आहे. सध्या या मार्गावर घोडबंदर रोड हा मुख्य पर्याय असून वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवासासाठी 60 ते 90 मिनिटे लागतात. मात्र बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा वेळ फक्त 15 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
कसा असेल मार्ग
प्रकल्पाच्या रचनेनुसार दोन समांतर बोगदे तयार केले जाणार आहेत. प्रत्येक बोगद्यात तीन लेन असतील, ज्यामध्ये एक आपत्कालीन लेनचा समावेश असेल. सुरक्षेच्या दृष्टीने दर 300 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज तयार केले जातील. तसेच अग्निशमन यंत्रणा, एलईडी डिस्प्ले आणि इतर आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
advertisement
स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला धूळ, आवाज आणि वाहतूक कोंडी याबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर उपाय म्हणून प्रकल्पातून निघणारी माती भुयारी मार्गानेच बाहेर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना कमीत कमी त्रास होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रकल्प कधी पूर्ण होणार?
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि बोरीवलीदरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 11:54 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
दीड तासाचा प्रवास 15 मिनिटांत, गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला आजच सुरुवात, ठाणे ते बोरिवली सुसाट






