Navi Mumbai : खेळत असलेल्या चिमुकल्याच्या गळ्याला स्पर्श झाला अन् होत्याचे नव्हते झाले; चोरट्याचा अंगावर काटा आणणारा प्रताप
Last Updated:
Shocking News Navi Mumbai : पनवेलमधील कळंबोली परिसरात खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलाच्या गळ्यातील सोन्याचे पान अनोळखी व्यक्तीने कापून चोरले. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नवी मुंबई : पनवेल परिसरात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. कळंबोली परिसरात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्यातील सोन्याचे पान चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका सोन्याच्या पाणासाठी चिमुरड्याच्या जिवाशी खेळ
सुनील डोंबाळे हे कळंबोली सेक्टर-1 परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा पाच वर्षीय मुलगा घरासमोरच्या गल्लीत नेहमीप्रमाणे खेळत होता. परिसर परिचित असल्याने कुटुंबीयांनी त्याच्यावर जास्त लक्ष ठेवले नव्हते. मात्र याच संधीचा फायदा घेत एका अनोळखी व्यक्तीने मुलाजवळ येत त्याच्याशी बोलण्याचा बहाणा केला.
क्षणातच त्या व्यक्तीने मुलाच्या गळ्यातील काळा धागा कापला. या धाग्यात सुमारे साडेचार हजार रुपये किमतीचे सोन्याचे पान अडकवलेले होते. चोरी केल्यानंतर ती व्यक्ती तात्काळ घटनास्थळावरून पळून गेली. मुलाला नेमके काय घडले हे सुरुवातीला कळले नाही. काही वेळाने गळ्यातील धागा नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलाने रडत घरी येऊन प्रकार सांगितला.
advertisement
यानंतर पालकांनी परिसरात शोध घेतला मात्र संशयिताचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर या घटनेची माहिती कळंबोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 12:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : खेळत असलेल्या चिमुकल्याच्या गळ्याला स्पर्श झाला अन् होत्याचे नव्हते झाले; चोरट्याचा अंगावर काटा आणणारा प्रताप






