Ram Mandir Ayodhya: रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीचा मुहूर्त का निवडला?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी एकत्र असतील. म्हणूनच हा मुहूर्त अयोध्येतल्या राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वांत आदर्श मानला जात आहे.
अयोध्या : राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातल्या अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यात धार्मिक आणि आध्यात्मिक गुरूंसह फिल्म स्टार्स, खेळाडू आणि अनेक मोठ्या उद्योजकांचाही समावेश आहे.
अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटं 8 सेकंदांपासून 12 वाजून 30 मिनिटं 32 सेकंदांपर्यंतच्या कालावधीचा हा मुहूर्त आहे. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हाच मुहूर्त का निवडण्यात आला, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्या मुहूर्ताविषयी अधिक माहिती घेऊ या.
advertisement
हिंदू पौराणिक कथांमधल्या माहितीनुसार प्रभू श्रीरामांचा जन्म अभिजित मुहूर्त, मृगशीर्ष नक्षत्र, अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थसिद्धी योग यांच्या संगमावर झाला होता. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी एकत्र असतील. म्हणूनच हा मुहूर्त अयोध्येतल्या राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वांत आदर्श मानला जात आहे.
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या औचित्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने 22 जानेवारीला शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी संपूर्ण राज्यात मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, '22 जानेवारी रोजी श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा राष्ट्रीय उत्सव आहे. या समारंभाशी जनमानस भावनिकदृष्ट्या जोडलेलं आहे. त्यामुळे त्या दिवशी प्रदेशातल्या सर्व शिक्षणसंस्थांना सुट्टी असेल आणि दारूची दुकानंही बंद ठेवली जातील,' असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.
advertisement
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरू होईल आणि 22 जानेवारीपर्यंत चालेल. अयोध्येत 16 जानेवारीपासून रामल्लाच्या पूजनाची प्रक्रिया सुरू होईल. 17 जानेवारीला श्रींच्या मूर्तीला परिसर भ्रमण घडवलं जाईल आणि गर्भागृहाचं शुद्धिकरण केलं जाईल. त्यानंतर 18 जानेवारीपासून अधिवास प्रारंभ होईल. म्हणजेच त्या त्या प्रकारच्या अधिवासात मूर्तीला ठेवलं जाईल. त्यात सकाळी आणि संध्याकाळी जलाधिवास, सुगंध आणि गंधाधिवास असेल. 19 जानेवारीच्या सकाळी फळ अधिवास आणि धान्य अधिवास असेल. 20 जानेवारीला सकाळी फुलं आणि रत्नं, तर संध्याकाळी तुपाचा अधिवास असेल. 21 जानेवारीला सकाळी साखर, मिष्टान्नं आणि मध अधिवास, तसंच औषधी आणि शय्या अधिवास असेल. 22 जानेवारीला माध्यान्ही रामलल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी काढून त्याला आरसा दाखवला जाईल.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
January 10, 2024 4:04 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ram Mandir Ayodhya: रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीचा मुहूर्त का निवडला?