मुंबई येथे भारत–फ्रान्स इनोव्हेशन फोरमच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भारत आणि फ्रान्सने 2026 हे ‘इंडिया-फ्रान्स ईयर ऑफ इनोव्हेशन’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला. स्टार्टअप्स, तंत्रज्ञान, शिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन दिले जात आहे.
आजच्या दिवशी जगातील दोन मोठे इनोव्हेशन हब एकत्र येत आहेत. जेव्हा आपण भारत आणि फ्रान्सबद्दल बोलतो, तेव्हा आपले नाते केवळ नवोन्मेषापुरते मर्यादित नाही, तर ते विश्वास आणि सामायिक मूल्यांवर आधारित आहे. याच विचारातून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि मी, आम्ही दोघांनी 2026 हे वर्ष ‘इंडिया-फ्रान्स ईयर ऑफ इनोव्हेशन’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ उत्सव नाही, तर आपली सामायिक बांधिलकी आहे — नवोन्मेषासाठीची बांधिलकी, नेतृत्वासाठीची बांधिलकी.
भारत आणि फ्रान्सने अनेक धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आपला परस्पर विश्वास अधिक दृढ झाला असून, आपल्या संबंधांना ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’च्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर नेले आहे. आगामी काळात प्रत्येक क्षेत्रात आपली सामूहिक सर्जनशीलता संपूर्ण जगासाठी अधिक चांगले भविष्य घडवेल.
भारताने आपल्या हजारो वर्षांच्या प्रवासात गणित, वैद्यकशास्त्र, धातुकर्म आणि वास्तुकला यांसारख्या अनेक क्षेत्रांत मानवकल्याणासाठी नवोन्मेष केले आहेत. आणि आता 21व्या शतकातही भारतातील युवावर्ग ‘जागतिक कल्याणासाठी’ नवोन्मेषाच्या या प्रवासात वेगाने पुढे जात आहेत. भारताच्या सशक्त स्टार्टअप परिसंस्थेपासून ते जागतिक दर्जाच्या संशोधन प्रयोगशाळांपर्यंत ‘आम्ही करू शकतो’ हा आशावाद निर्माण होतो आहे. ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमामुळे अवघ्या एका दशकात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनला आहे. 2014 मध्ये भारतात केवळ चार युनिकॉर्न होते, तर आज भारतात 120 हून अधिक युनिकॉर्न आहेत. त्यांचे एकूण मूल्य 350 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किंवा सुमारे 300 अब्ज युरो इतके आहे. आज जगातील जवळजवळ प्रत्येक मोठी तंत्रज्ञान कंपनी भारतातील स्टार्टअप्स आणि नवोन्मेषाबरोबर कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेली आहे.
advertisement
गेल्या दशकात आपण शाळांपासून उद्योगांपर्यंत नवोन्मेषासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण केली आहे. शाळांमधील ‘अटल टिंकरिंग लॅब्स’पासून मेंटरशिप, शिष्यवृत्ती आणि स्टार्टअप भांडवलापर्यंत आज एक सशक्त जाळे तयार झाले आहे. आज भारत जगातील सर्वात मोठ्या हॅकाथॉन परिसंस्थांपैकी एक आहे. इथे खासगी क्षेत्राच्या संशोधन आणि नवोन्मेष योजनांद्वारे थेट पाठबळ दिले जात आहे. ‘स्टार्टअप इंडिया 2.0’द्वारे डीप-टेक नवोन्मेषासाठी भांडवल उभारणी केली जात आहे.
advertisement
आपल्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ला येत्या 24 फेब्रुवारी रोजी एक दशक पूर्ण होणार आहे, आणि इतक्या कमी कालावधीत ते जगातील सर्वात मोठ्या सर्व स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या नवोन्मेष मोहिमांपैकी एक बनले आहे. आपल्या 10,000 हून अधिक टिंकरिंग लॅब्स आज 1 कोटीहून अधिक विद्यार्थी आणि नवोन्मेषकांसोबत कार्यरत आहेत. या मिशनसोबत 100 पेक्षा अधिक इनक्यूबेटर्स आणि अनेक डीप-टेक स्टार्टअप्स जोडले गेले आहेत. मी येथे उपस्थित सर्व उद्योग क्षेत्रातील नेत्यांना विशेष आवाहन करतो की त्यांनी ‘अटल इनोव्हेशन मिशन’सोबत अवश्य जोडावे.
advertisement
विकसित भारताच्या प्रवासाला नवोन्मेषाचे बळ आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातही आम्ही नवोन्मेष परिसंस्था अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांमध्ये आम्ही मिशन मोडवर काम करत आहोत. यासोबतच वस्त्रोद्योग, रसायन उद्योग, क्रीडा साहित्य, प्रिसिजन टूल्स, इलेक्ट्रॉनिक्स, पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात नवोन्मेषाला प्रोत्साहन दिले जाईल.
advertisement
भारत महिला-नेतृत्वाखालील संशोधन आणि नवोन्मेषाचा उज्ज्वल आदर्श बनत आहे, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आज सुमारे 50 टक्के स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थीनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) क्षेत्रात पदवीधर होत आहेत. कृषी, आरोग्य तसेच अवकाश मोहिमा अशा सर्वच क्षेत्रांत महिला नेतृत्व करत आहेत.
भारताच्या वेगवान प्रगतीला आणि मोठ्या प्रमाणावरील क्षमतेला जेव्हा फ्रान्सची ताकद साथ देते, तेव्हा जगासाठी नवे संधीमार्ग खुलतात. आज येथे दोन्ही देशांतील उत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि कौशल्य एकत्र आले आहे. परस्परांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देत दोन्ही देश एकमेकांचे मनापासून स्वागत करत आहेत. 2030 पर्यंत 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय फ्रान्सने निश्चित केले आहे. युवा शक्ती आणि तरुण बुद्धिमत्तेचा सुंदर मेळ घालण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे.
advertisement
वर्ष 2026 हे भारत–फ्रान्स संबंधांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. या वर्षात लोकांमधील परस्पर संवाद आणि देवाणघेवाण अधिक दृढ होईल, तसेच उद्योग भागीदारीचा विस्तार होईल. आज ज्या प्रकारे आपण भारतात एकत्र आलो आहोत, त्याचप्रमाणे जून 2026 मध्ये फ्रान्समध्ये ‘भारत इनोव्हेट्स 2026’ या उपक्रमांतर्गत भारतातील सर्वोत्तम तंत्रज्ञान-आधारित स्टार्टअप्स जगासमोर सादर करण्यात येतील. ही स्टार्टअप्स आरोग्य, हवामान आणि सुरक्षा यांसारख्या जागतिक आव्हानांवर उपाय विकसित करत आहेत.
advertisement
मी फ्रान्स तसेच जगभरातील नेते, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि विद्यापीठांना मनःपूर्वक आमंत्रित करतो. चला, भारतासोबत मिळून असे भविष्य घडवूया जिथे तंत्रज्ञान मानवतेच्या सेवेसाठी कार्य करेल आणि प्रगती सर्वांसाठी समान व समावेशक असेल. या भावनेतून आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आणि माझ्या मित्राचेही आभार मानतो, त्यांनी वेळ काढला आणि आपले विचार मांडले तसेच भारत-फ्रान्स संबंधांबाबत व्यक्त केलेला विश्वास याबद्दल, एक मित्र म्हणून तसेच भारत-फ्रान्समधील दृढ मैत्रीच्या भावनेतून, मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 4:15 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
मुंबई येथे भारत–फ्रान्स इनोव्हेशन फोरमच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन









