आता चपाती बनवायचं नो टेन्शन, कोल्हापुरातील तरुणाने शोधला उत्तम उपाय, अनेकांना होणार फायदा
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
ऋषिकेश राजेंद्र कल्याणकर या तरुणाने फ्रोजन चपातीचा व्यवसाय सुरू केलाय. त्याचा फायदा अनेकांना होणार आहे.
जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी राहायचं म्हटलं की जेवण ही मोठी समस्या असते. त्यात चपाती बनवता न येणं हे अनेकांचं टेन्शन असतं. आता या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. कारण कोल्हापुरातील एका युवा उद्योजकानं यावर उत्तम उपाय शोधला आहे. त्यामुळे आता कुणीही अगदी दोन मिनिटांत चपाती बनवू शकणार आहे. ऋषिकेश राजेंद्र कल्याणकर या तरुणाने फ्रोजन चपातीचा व्यवसाय सुरू केलाय. त्याचा फायदा अनेकांना होणार आहे.
advertisement
कोल्हापुरातील ऋषिकेश कल्याणकर या तरुणाने पहिल्यांदाच फ्रोजन चपाती तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. खरंतर एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर सात वर्षांचा अभ्यास आणि संशोधन यातूनच त्याने हा व्यवसाय उभा केला आहे. फ्रोजन चपातीची संकल्पना ऋषिकेशला भारतीयांच्या रोजच्या जेवणामुळे आली. भारतीयांचे जेवण हे चपाती शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मात्र बऱ्याच वेळा काही कारणास्तव चपाती तयार करून खाणे शक्य होत नाही. त्यासाठीच फ्रोजन चपाती तयार करून विकण्याचे ठरवले, असे ऋषिकेश सांगतो.
advertisement
ही चपाती मशीनच्या सहाय्याने 80 टक्के भाजलेली असून 20 टक्के भाजायची बाकी असते. अशा अर्ध्या कच्च्या स्वरूपात ही चपाती थंड करून पॅक केली जाते. ही चपाती 80 टक्के भाजलेली असल्याने बाहेर घेऊन जाऊन तिथे हवी तेव्हा भाजून खाता येऊ शकते. ही चपाती सामान्य तापमानात दोन दिवस तर डीप फ्रिजमध्ये 12 दिवस चांगली राहू शकते, असेही ऋषिकेशने सांगितले.
advertisement
फ्रोजन चपाती पूर्णपणे मशीनच्या सहाय्याने बनवली जाते. विकतचे गहू दळून पीठ मळण्यापासून ते चपातीची पॅकिंगपर्यंत सर्व कामे मशीनद्वारे केली जातात. सुरुवातीला दळलेले गव्हाचे पीठ मशीन मध्ये मळून घेतले जाते. त्यानंतर दुसऱ्या एका मशीनमध्ये आधीच सेट केलेल्या वजनाचे गोळे तयार केले जातात. हे तयार केलेले गोळे एका मोठ्या हिटिंग मशीन मधील स्टीलच्या तव्यावर ठेवावे लागतात. या मशीनमध्ये चपाती प्रेस करून भाजली जाते. या ठिकाणी चपातीमधील सर्व ओलावा निघून जाऊन ती 80 टक्के भाजली जाते. पुढे ही चपाती कन्व्हेयर वरुन थंड केली जाते. कन्व्हेयर बेल्टवरून चपाती पुढे जातानाच तिला कोरडे पीठ लावले जाते. शेवटी ही चपाती पॅक करून विक्रीसाठी तयार होते, अशी माहिती ऋषिकेशने दिली.
advertisement
फ्रोजन चपाती व्यवसायात ऋषिकेशने चांगलीच पकड घेतली आहे. ही फ्रोजन चपाती कोल्हापुरातील अनेक ग्राहक विकत घेतच आहेत. मात्र महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई अशा मोठ्या शहरांसह कर्नाटक, गोवा, तेलंगणा अशा राज्यांमध्ये देखील या फ्रोजन चपात्या पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आठवड्यात किमान 300 ते 400 चपात्या भारताबाहेर देखील पाठवल्या जातात, असेही ऋषिकेश सांगतो.
advertisement