25, 30 की 35? आई होण्याचं योग्य वय कोणतं? डॉक्टरांनी सांगितलं चाळीशीत काय करावं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
घरात पाळणा हलावा हे जवळपास प्रत्येक नवविवाहित जोडप्याचं स्वप्न असतं. परंतु बाळाचा विचार नेमका कधी करावा, याबाबत निर्णय घेणं हा सर्व जोडप्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. सध्या आधी करियर मग लग्न आणि मग काही वर्षांनी बाळ अशी विचारसरणी मोठ्या प्रमाणावर रुजू लागली आहे. तर दुसरीकडे, बाळाला जन्म देण्याच्या निर्णयापर्यंत आई-वडिलांची तिशी आलेली असल्यामुळे बाळ होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया, बाळाला नेमका कोणत्या वयात जन्म द्यावा? (प्राची केदारी, प्रतिनिधी / पुणे)
पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अर्चना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 35व्या वर्षापर्यंत दाम्पत्याने बाळाचा विचार करायला हवा. कारण तोपर्यंत गरोदरपणात काही अडचणी येण्याची शक्यता फार कमी असते आणि बाळाचा जन्मही सुखरूप होतो. विशेष म्हणजे या वयापर्यंत महिलेची प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होऊ शकते. परंतु त्यानंतर मात्र सिझरियन होण्याची शक्यता जास्त निर्माण होते. शिवाय शरिराला वयानुसार बीपी, शुगर असे विविध आजार जडतात. त्यामुळे आई व्हायचं असेल तर वयाची पस्तीशी ओलांडण्याच्या आधी हा निर्णय घेणं कधीही चांगलं.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे विशीत एखाद्या विवाहित महिलेने बाळाला जन्म दिला तर तिच्या गरोदरपणात काही अडचणी येत नाहीत असं नाही. परंतु या वयात अडचणी येण्याची शक्यता फार कमी असते. शिवाय एखाद्या दाम्पत्याचं वय 30पेक्षा कमी असेल आणि बाळासाठी प्रयत्न करूनही त्यांना गोड बातमी मिळत नसेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं अर्चना पाटील यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण व्यवस्थापन. तुमची जीवनशैली व्यवस्थित असेल तर तुम्हाला जास्त ताण येणार नाही. अर्थात मानसिक आरोग्यही उत्तम राहील. शिवाय केवळ गरोदरपणातच नाही, तर इतरवेळीही सुदृढ राहण्यासाठी फास्ट फूड टाळायला हवं. तसंच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली.
advertisement
दरम्यान, गायिका कार्तिकी गायकवाड ही आई होणार असल्याने तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला आहे. लिटिल चॅम्प म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कार्तिकीचं वय सध्या 26 वर्षे इतकं आहे. 2020 साली तिने रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर 4 वर्षांनी या दाम्पत्याने गुड न्यूज दिली आहे. त्यांंच्यावर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.