Business Success: अवघ्या 10 हजारांत सुरू केला बिझनेस, वर्षाला 40 लाखांची कमाई, मुंबईकर धनश्री करते काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Business Success: मुंबईतकर तरुणीने अवघ्या 10 हजारांच्या गुंतवणुकीत खास व्यवसाय सुरू केला. आता तिची वर्षाची कमाई 40 लाखांच्या घरात आहे.
आजची तरुणाई नोकरीवरच न थांबता स्वतःच्या व्यवसायाकडेही मोठ्या उत्साहाने वळताना दिसते. अशीच एक तरुणी आहे मुंबईतील धनश्री सावंत. वयाच्या 26 व्या वर्षी तिने एक आगळावेगळा व्यवसाय सुरू करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. धनश्रीने अनेक वर्षे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम केले. मात्र नोकरीत मन न रमल्यामुळे तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
धनश्रीने ‘माऊली सेलिब्रेशन्स’ या गिफ्टिंग कंपनीची सुरुवात केली. सामान्यपणे गिफ्ट घ्यायचे म्हटले की ऑनलाईन मागवावे लागतात आणि त्यात वस्तू अपेक्षेप्रमाणे मिळेल की नाही याची शंका असते. हे लक्षात घेऊन तिने ग्राहकांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांच्या बजेटमध्ये गिफ्ट डिझाईन करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. तिच्या सेवेमुळे ग्राहकांना एक वेगळाच अनुभव मिळू लागला.
advertisement
या कंपनीत फक्त वाढदिवस किंवा लग्नापुरतेच नव्हे तर सण-वार, खास प्रसंग, तसेच कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी लागणारी गिफ्टसुद्धा तयार केली जातात. गिफ्ट्सची सुरुवात केवळ 75 रुपयांपासून होते आणि त्याचबरोबर घरपोच सेवा दिली जाते. त्यामुळे सामान्य माणसापासून मोठ्या कंपनीपर्यंत सर्वांना ही सेवा सहज उपलब्ध झाली आहे.
advertisement
लॉकडाऊनच्या काळात धनश्रीला मोठा धक्का बसला, कारण तिच्या आईचे निधन झाले. या कठीण काळात तिला वडिलांची साथ मिळाली. वडिलांचा किराणा व्यवसाय पाहत ती मोठी झाली होती, त्यामुळे ग्राहकांशी संबंध कसे ठेवायचे आणि व्यवसाय कसा सांभाळायचा हे तिने घरातूनच शिकले होते. या अनुभवाचा उपयोग करूनच तिने स्वतःचा व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा केला.
advertisement
फक्त दहा हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू झालेला हा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काही वर्षांच्या मेहनतीनंतर आज धनश्री सावंत आपल्या ‘माऊली सेलिब्रेशन्स’मधून दरवर्षी जवळपास 40 लाख रुपयांचे उत्पन्न कमावते. स्वतःची ओळख निर्माण करून तिने दाखवून दिले की नोकरीपुरतेच न थांबता व्यवसायातही तरुणाई मोठे यश मिळवू शकते.