8 वर्षीय मैराबीचा झोपेतच गेला जीव; शेडमध्ये झोपलेली असतानाच ती कार आली अन्...पुण्यात भयंकर घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कामाच्या ठिकाणीच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मैराबी झोपलेली होती. दरम्यान, रात्रीच्या वेळी आरोपी भरत नेहेते आपली कार या शेडमध्ये पार्क करण्यासाठी घेऊन आला
पुणे: लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढू खुर्द येथून एक अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. यात एका आठ वर्षांच्या मुलीचा कार अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मैराबी रसुलसाब बळीगर (वय ८) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक भरत रमेश नेहेते (वय ४६, रा. वढू खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मैराबीचे आई-वडील हे मजूर असून वढू खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर काम करतात. कामाच्या ठिकाणीच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मैराबी झोपलेली होती. दरम्यान, रात्रीच्या वेळी आरोपी भरत नेहेते आपली कार या शेडमध्ये पार्क करण्यासाठी घेऊन आला. अंधार असल्याने शेडमध्ये मुलगी झोपलेली आहे, हे चालकाच्या लक्षात आले नाही.
कार पार्क करत असताना ती थेट झोपलेल्या मैराबीच्या अंगावरून गेली. या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी लालासाहेब कालेगार (रा. लोणीकंद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणीकंद पोलिसांनी कारचालक भरत नेहेते याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 8:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
8 वर्षीय मैराबीचा झोपेतच गेला जीव; शेडमध्ये झोपलेली असतानाच ती कार आली अन्...पुण्यात भयंकर घटना









