Pune News : पुणे porsche कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या फरार वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार झाले होते, अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : पुण्यात रविवारी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारच्या धडकेत दोघांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला. मात्र त्यानंतर या प्रकरणात या अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलानं पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. यामध्ये इंजिनिअर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. अखेर त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
advertisement
विशाल अगरवाल यांचा हा मुलगा अल्पवयीन असल्याचे कारण देत न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र अल्पवयीन असुनही त्याला पोर्शे कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अगरवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच विशाल अगरवाल नॉटरिचेबल झाले होते. त्यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगमधून अटक केली आहे.
Location :
First Published :
May 21, 2024 8:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणे porsche कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या फरार वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात









