MHADA Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या आणखीन 3000 घरांची निघणार लॉटरी, तारीख काय?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे मंडळातर्फे आणखी सुमारे 3,000 परवडणाऱ्या घरांसाठी नवीन लॉटरी काढण्यात येणार आहे.
पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 10 फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या 4,186 घरांची सोडत काढण्यात आली होती. या घरांसाठी तब्बल 2 लाख 15 हजार 965 अर्ज प्राप्त झाले होते. या सोडतीनंतर आता येत्या मार्च महिन्यात पुणे मंडळातर्फे आणखी सुमारे 3,000 परवडणाऱ्या घरांसाठी नवीन लॉटरी काढण्यात येणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडा) सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
म्हाडाचे नवे प्रकल्प प्रगतीपथावर
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मार्च महिन्यातील आगामी सोडतीसोबतच विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. शिरूर येथे 574 घरांचे, तर खराबवाडी येथे 194 व्यापारी गाळ्यांचे काम वेगाने सुरू आहे. ताथवडे येथील पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील सुमारे 80 टक्के काम झाले आहे. लवकरच येथे 750 निवासी आणि अनिवासी गाळे सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय म्हाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदर येथेही नवीन घरांचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
advertisement
प्रक्रिया आणि लाभार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना
म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल वानखडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले की, जमिनींची उपलब्धता वाढत असल्याने भविष्यातही परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाविना व पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. पुणे मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी निवड झालेल्या लाभार्थ्यांना IHLMS 2.0 प्रणालीवर ठराविक कालावधीत घर स्वीकारण्याबाबत निर्णय नोंदवण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक कागदपत्रे वेळेत ऑनलाइन सादर केल्यास देकारपत्र लवकर मिळणार असून, 20 टक्के योजनेतील उरलेली घरे बुक माय होम पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार आहेत.
advertisement
तक्रारींची म्हाडाकडून दखल..
20 टक्के योजनेतील घरांसाठी जादा पैसे मागितल्याच्या तक्रारींची म्हाडाने दखल घेतली असून, अनेक प्रकरणांत वाढीव शुल्क रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लाभार्थ्यांना 50 टक्के पार्किंग देणे बंधनकारक असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, चंदनगर–खराडी येथील 15 गुंठे जमिनीवरील अतिक्रमण हटवून ती जमीन म्हाडाच्या ताब्यात घेण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 7:38 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
MHADA Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या आणखीन 3000 घरांची निघणार लॉटरी, तारीख काय?







