MHADA Pune: पुणेकरांनो, हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! प्रतीक्षा संपली, म्हाडाची मेगा सोडत 'या' दिवशी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे मंडळाच्या २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील या ४,१८६ घरांसाठी तब्बल २ लाख १५ हजार अर्ज दाखल झाले आहेत.
पुणे : पुणेकर आणि हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो अर्जदारांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडचणी आणि लागोपाठच्या आचारसंहितेमुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची ४,१८६ घरांची सोडत आता १० फेब्रुवारीला निघणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता ९ फेब्रुवारीला संपताच, दुसऱ्याच दिवशी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
आचारसंहितेचा अडथळा दूर
यापूर्वी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये ही सोडत निघणे अपेक्षित होते. मात्र, आधी महापालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडली. म्हाडाने राज्य निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागितली होती, परंतु ती मिळू शकली नाही. आता आचारसंहिता संपत असल्याने, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी १० फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित केला आहे.
advertisement
२ लाख १५ हजार अर्जदारांची धाकधूक
सप्टेंबर महिन्यात या घरांसाठी नोंदणी सुरू झाली होती. पुणे मंडळाच्या २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील या ४,१८६ घरांसाठी तब्बल २ लाख १५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून अनामत रक्कम म्हाडाकडे जमा असूनही निकाल लागत नसल्याने अर्जदारांमध्ये मोठा रोष होता. समाज माध्यमांवरून म्हाडाच्या कारभारावर टीकाही झाली. आता सोडतीची तारीख निश्चित झाल्याने अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
या सोडतीसाठी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागण्यात आली आहे. १० फेब्रुवारीला कोणत्याही परिस्थितीत सोडत मार्गी लावण्याचा निर्धार म्हाडा प्रशासनाने केला आहे. जर हा मुहूर्त हुकला, तर अर्जदारांचा रोष अधिक वाढण्याची शक्यता असल्याने म्हाडाचे अधिकारी युद्धपातळीवर तयारीला लागले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 9:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
MHADA Pune: पुणेकरांनो, हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! प्रतीक्षा संपली, म्हाडाची मेगा सोडत 'या' दिवशी








