'गुगलवर माझं नाव शोध, मग कळेल', बारामतीत मटणाच्या दुकानात ऑफिसरची मग्रुरी; दुकानदाराचं केलं अपहरण
- Reported by:JITENDRA JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुर्यनगरी येथील दुकानावर मटण खरेदीदरम्यान एका इसमाने लाईनमध्ये उभे राहण्यास नकार देत 'गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे' अशी दमदाटी केली.
बारामती: 'लाईनमध्ये थांबायला वेळ नाही, मी मोठा आहे' अशी मग्रुरी दाखवणाऱ्या इसमाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटण दुकानदाराचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामतीत तालुक्यात घडली. एवढच नाही तर कोयता, बेल्टने दुकानदाराला बेदम मारहाण केली.
ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय 27, रा.सावळ ता.बारामती) हे 'जय भवानी मटण शॉप' चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. डिसेंबर रोजी सुर्यनगरी येथील दुकानावर मटण खरेदीदरम्यान एका इसमाने लाईनमध्ये उभे राहण्यास नकार देत 'गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे' अशी दमदाटी केली. त्यावेळी वाद-विवाद झाला. वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तो इसम मटण घेऊन निघून गेला. ऑनलाईन पेमेंटवरून त्याचे नाव 'स्वागत हनुमंत सोरटे' असे असल्याचे समोर आले.
advertisement
या घटनेचा राग मनात धरून ( 25 डिसेंबर) रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर आटोळे हे दुकानातील कामगारासह बाहेर गेले होते. ऋषी गावडे याच्यासोबत नियोजन करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट व क्रेटा गाड्यांमधून आलेल्या 5 इसमांनी त्यांना जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवले असा आरोप करण्यात आला आहे. जळोची गावाच्या दिशेने नेताना व्हिडीओ कॉलद्वारे पूर्वी दुकानावर वाद घातलेला इसम संपर्कात होता. 'मी सांगितले तसेच करा, मला बघू द्या यात किती दम आहे,' असे म्हणत त्याने मारहाणीचे आदेश दिल्याचा आरोप आहे.
advertisement
कोयत्याच्या मुठीने, बेल्टने बेदम मारहाण
कन्हेरी रोड व जळोची ब्रिज परिसरात नेऊन आरोपींनी कोयत्याचे मुठीने, बेल्टने मारहाण केली. 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली. या दरम्यान पोलिस, फिर्यादीचे भाऊ व नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर ऋषी गावडे यानेही शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी किडनॅपिंग करून मारहाण करणे असा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
आरोपीला अटक
आरोपी ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली असून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात संकेत मुसळे, शितल बेंगारे राहणार पारवडी हे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न होत आहे. इतर आरोपींबाबत तपास सुरू आहे. दरम्यान बारामती तालुका पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याबाबत दाखल गुन्ह्यात श्रीराज अविनाश चव्हाण राहणार बारामती यास सुद्धा अटक करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 4:01 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'गुगलवर माझं नाव शोध, मग कळेल', बारामतीत मटणाच्या दुकानात ऑफिसरची मग्रुरी; दुकानदाराचं केलं अपहरण











