Pune News: हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा; पुणेकरांनी भरले लाखो रूपये, पुढं घडलं असं की झोप उडाली
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हेलिकॉप्टरने स्वस्तात यात्रा घडवून आणण्याचे प्रलोभन दाखवून एका ट्रॅव्हल एजंटने तब्बल ५३ ज्येष्ठ नागरिकांची ११ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसरात ज्येष्ठ नागरिकांना चारधाम यात्रेचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हेलिकॉप्टरने स्वस्तात यात्रा घडवून आणण्याचे प्रलोभन दाखवून एका ट्रॅव्हल एजंटने तब्बल ५३ ज्येष्ठ नागरिकांची ११ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
बाळासाहेब कुंजीर स्टेडियम येथील 'आनंद हास्य क्लब'च्या सदस्यांना लक्ष्य करून ही फसवणूक करण्यात आली. राजेंद्रनाथ हजारीराम जस्ताल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 'भक्ती दर्शन टूर्स'चा संचालक योगेश प्रभाकर देशमुख याने क्लबमधील ५२ सदस्यांकडून प्रत्येकी ४५ हजार रुपये जमा केले होते. नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेला हा फसवणुकीचा सिलसिला २५ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होता.
advertisement
एकूण ५४ लोकांपैकी २८ जणांना आरोपी यात्रेला घेऊन गेला होता. मात्र तिथेही त्याने खोटी आश्वासने दिली. हेलिकॉप्टर सफारीसाठी १६ लोकांकडून प्रत्येकी १५ हजार रुपये जास्तीचे घेऊनही त्यांना कोणतीही सेवा पुरवली नाही. उर्वरित २६ पैकी केवळ ५ जणांचे पैसे परत करण्यात आले. मात्र, २१ जणांचे मूळ ९ लाख ४५ हजार रुपये आणि १६ जणांच्या हेलिकॉप्टर सुविधेचे २ लाख ४० हजार रुपये, असा एकूण ११ लाख ८५ हजार रुपयांचा अपहार करून आरोपीने पोबारा केला.
advertisement
पैसे परत न मिळाल्याने अखेर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांत धाव घेतली. सांगवी पोलिसांनी योगेश देशमुख विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 9:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा; पुणेकरांनी भरले लाखो रूपये, पुढं घडलं असं की झोप उडाली










