पाईन मळा हादरला! 62 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांचा थरार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
62 वर्षीय दामोदर जयराम मिडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून चोरट्यांनी घरात शिरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
सचिन तोडकर, प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक अत्यंत भीषण आणि संतापजनक घटना समोर आली आहे. थोरांदळे गावातील एका निर्जन मळ्यात राहणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात नराधमांनी निर्घृण खून केला आहे. या खुनी दरोड्यामुळे संपूर्ण आंबेगाव तालुका हादरून गेला असून ग्रामीण भागात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील पाईन मळा परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 62 वर्षीय दामोदर जयराम मिडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून चोरट्यांनी घरात शिरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दामोदर मिडे हे पाईन मळा येथील आपल्या घरात एकटेच वास्तव्यास होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोड्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात प्रवेश केला. मिडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने भीषण वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता की दामोदर मिडे यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
advertisement
शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे सावट
घरातील नेमका किती ऐवज लंपास झाला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, घरातील सामान विखुरलेले पाहता हा दरोड्याचाच प्रकार असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले असून, खुन्यांचा मागावर पोलीस पथके रवाना झाली आहेत. मळयावर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे सावट आहे.
advertisement
शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे कॅनलवरील विद्युत रोहित्र चोरी
शिरूर तालुक्यातील वाघाळे परिसरातून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. कॅनलवरील विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्याच्या शेतातील असलेले विद्युत रोहित्र रात्री चोरीस गेले, स्थानिक शेतकरी शेताकडे जात असताना डीपीचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती देत रांजणगाव कारेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 3:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पाईन मळा हादरला! 62 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांचा थरार








