सहकाऱ्याचा 'तो' एक शब्द जिव्हारी लागला; पुण्यातील अतुलनं मध्यरात्रीच गाठलं रेल्वे स्टेशन अन् हादरवणारं पाऊल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अपमानाचा हा घाव इतका खोल होता की, २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अतुलने टोकाचे पाऊल उचलले. त्याने पुणे ते कोल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.
पुणे : पुण्यातील फुरसुंगी भागात एक अत्यंत संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ चोरीचा खोटा आळ घातल्यामुळे आणि सर्वांसमोर अपमानित केल्यामुळे एका २२ वर्षीय तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. अतुल लक्ष्मण अहिरे (रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल एका खासगी ठिकाणी कामाला होता. तिथल्याच दोन आरोपींनी अतुलवर चोरीचा आरोप केला. केवळ आरोप करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी अतुलला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि सर्वांसमोर मारहाणही केली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अतुलसाठी हा अपमान सहन करण्यापलीकडे होता. चारित्र्यावर घेतलेल्या या संशयामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात होता.
advertisement
मध्यरात्री रेल्वेखाली झोकून दिलं
अपमानाचा हा घाव इतका खोल होता की, २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अतुलने टोकाचे पाऊल उचलले. त्याने पुणे ते कोल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. ऐन उमेदीच्या काळात एका तरुणाने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने फुरसुंगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांची कारवाई
अतुलच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. निरपराध मुलाला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 7:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सहकाऱ्याचा 'तो' एक शब्द जिव्हारी लागला; पुण्यातील अतुलनं मध्यरात्रीच गाठलं रेल्वे स्टेशन अन् हादरवणारं पाऊल









