पुण्यात थरार! हत्या करण्यासाठी कोयते घेऊन निघालेली 4 अल्पवयीन मुलं, अचानक पोलिसांनी दुचाकी अडवली अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
किरकोळ वादातून एकाचा खून करण्यासाठी भररस्त्यात दुचाकीवरून कोयते घेऊन निघालेल्या चार अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेने हडपसर परिसरातून ताब्यात घेतले.
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात 'कोयता गँग'ची दहशत अद्याप कायम असल्याचे समोर आले आहे. किरकोळ वादातून एकाचा खून करण्यासाठी भररस्त्यात दुचाकीवरून कोयते घेऊन निघालेल्या चार अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेने हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. वेळीच झालेल्या या कारवाईमुळे शहरात मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या चारही अल्पवयीन मुलांचा एका व्यक्तीशी जुना वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी खुनाचा कट रचला होता. १७ मार्च रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक हडपसर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना ही मुले एकाच दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
advertisement
सापळा लावून कारवाई
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लक्ष्मीमाता मंदिराजवळ सापळा रचला आणि चौघांनाही हटकले. झडती घेतली असता त्यांच्याकडे तीक्ष्ण धारदार कोयते आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांची दुचाकी आणि शस्त्रे जप्त केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत, "एकाचा खून करण्यासाठीच आम्ही निघालो होतो," अशी धक्कादायक कबुली या मुलांनी दिली आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडे अशी धोकादायक शस्त्रे सापडल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
advertisement
'एमडी' (मेफेड्रोन) ड्रग्जचा पर्दाफाश
दुसऱ्या एका घटनेत पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. यात रांजणगाव एमआयडीसी परिसरात 'एमडी' (मेफेड्रोन) ड्रग्जचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात ३४ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 10:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात थरार! हत्या करण्यासाठी कोयते घेऊन निघालेली 4 अल्पवयीन मुलं, अचानक पोलिसांनी दुचाकी अडवली अन्...









