धक्कादायक! पत्नीसोबत घडलेली 'ती' घटना जिव्हारी लागली; पुण्यात उच्चशिक्षित आयटी कर्मचाऱ्यानं संपवलं आयुष्य
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कुमार यांची पत्नी प्रीती ऐश्वर्य या रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतात. काही काळापूर्वी त्यांच्यावर ठाणे जिल्ह्यात एका प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
पिंपरी-चिंचवड: माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील एका उच्चशिक्षित कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली परिसरात घडली आहे. कुमार ऐश्वर्य (वय ३९, रा. चऱ्होली बुद्रुक) असे मृताचे नाव आहे. कौटुंबिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
नेमकी घटना काय?
दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार ऐश्वर्य हे खराडी येथील एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत कार्यरत होते. २९ जानेवारी रोजी त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र दुर्दैवाने रविवारी (१ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
आत्महत्येचे कारण काय?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, कुमार यांची पत्नी प्रीती ऐश्वर्य या रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतात. काही काळापूर्वी त्यांच्यावर ठाणे जिल्ह्यात एका प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या कायदेशीर प्रक्रियेमुळे आणि कौटुंबिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावामुळे कुमार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होते. या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
advertisement
तपास सुरू
कुमार ऐश्वर्य यांच्या अकाली निधनाने चऱ्होली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिघी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येपूर्वी त्यांनी काही चिठ्ठी लिहिली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, त्यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 6:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! पत्नीसोबत घडलेली 'ती' घटना जिव्हारी लागली; पुण्यात उच्चशिक्षित आयटी कर्मचाऱ्यानं संपवलं आयुष्य







