पुणेकर वेळ वाचणार! चाकण-तळेगावची वाहतूक कोंडीतून सुटका, गेमचेंजर प्लॅन अंतिम टप्प्यात
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: औद्योगिक विस्तारामुळे वाढलेल्या वाहतुकीचा भार कमी करून प्रवासाचा वेग वाढवणे आणि वेळेची बचत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रांमधील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने पर्यायी रस्त्याचे काम हाती घेतले असून ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. चाकण–तळेगाव–शिक्रापूर हा मुख्य मार्ग दोन्ही औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्त्वाचा असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असते. परिणामी, कामगार, उद्योग प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून सुरू होणारा आणि पुढे पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला. देहूरोडकडून तळेगाव औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा एकमधील नवलाख उंबरे गावाबाहेरून 1.7 किलोमीटर लांबीचा सहापदरी काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असून तो टप्पा दोनला जोडण्यात आला आहे. सध्या नवलाख उंबरे गावातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरूनच वाहतूक होत असल्याने येथे मोठी कोंडी निर्माण होत होती. नवीन रस्ता सुरू झाल्यानंतर गावातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी माहिती एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे यांनी दिली. या टप्प्यासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
advertisement
तळेगाव टप्पा दोन आणि चाकण टप्पा दोनमधून पुढे जात हा रस्ता टप्पा पाचशी जोडला जाणार आहे. कॉर्निंग कंपनीपासून भामा नदीपर्यंत सुमारे 6 किलोमीटर लांबीचा चारपदरी काँक्रीट रस्ता विकसित केला जात आहे. या विस्तारित कामासाठीही कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
औद्योगिक विस्तारामुळे वाढलेल्या वाहतुकीचा भार कमी करून प्रवासाचा वेग वाढवणे आणि वेळेची बचत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. उद्योग क्षेत्रातील कामगारांनीही या कामाचे स्वागत केले असून, लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 11:11 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर वेळ वाचणार! चाकण-तळेगावची वाहतूक कोंडीतून सुटका, गेमचेंजर प्लॅन अंतिम टप्प्यात







