बनावट पत्नी, पैशाचा घोळ अन् फसवणूक; रूबी हॉल किडनी रॅकेटप्रकरणात वर्षभरानंतर धक्कादायक खुलासे
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
किडनी घेणारा रुग्ण (रिसीव्हर) अमित अण्णासाहेब साळुंखे याने आपल्या खऱ्या पत्नीऐवजी सारिका गंगाराम सुतार या महिलेला कागदोपत्री 'बनावट पत्नी' दाखवून तिची किडनी मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक येथील गाजलेल्या बेकायदेशीर किडनी रॅकेट प्रकरणाच्या चौकशीत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या १० सदस्यीय विशेष समितीने आपला ४७० पानांचा विस्तृत अहवाल सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या समितीने गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणाचा सखोल तपास केला होता.
तपासातील धक्कादायक खुलासे:
या अहवालातून अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. मुख्यत्वे, किडनी घेणारा रुग्ण (रिसीव्हर) अमित अण्णासाहेब साळुंखे याने आपल्या खऱ्या पत्नीऐवजी सारिका गंगाराम सुतार या महिलेला कागदोपत्री 'बनावट पत्नी' दाखवून तिची किडनी मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, किडनी देण्याच्या व्यवहारात ठरलेले पैसे न मिळाल्याने किडनीदात्या महिलेच्या बहिणीने थेट '१००' नंबरवर फोन करून पोलिसांत तक्रार केली. यासोबतच महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यास नकार दिल्याचंही तिने सांगितले. त्यानंतरच हे रॅकेट उजेडात आले.
advertisement
समितीने ३ ऑक्टोबर २०२४ पासून कामाला सुरुवात केली होती. या काळात केवळ रुग्ण आणि दाता यांचीच नाही, तर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, रुग्णालयातील प्रशासकीय कर्मचारी आणि मध्यस्थी करणाऱ्या एजंट्सचीही कसून चौकशी करण्यात आली. तसेच, ससून रुग्णालयातील अधिकारी आणि पुणे गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडूनही माहिती घेण्यात आली. अहवालात या संपूर्ण रॅकेटच्या कार्यपद्धतीवर आणि संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे घडलेल्या प्रकारांवर सडकून टीका करण्यात आली आहे.
advertisement
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अहवाल स्वीकारल्यानंतर यावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे दोषी डॉक्टर्स आणि रुग्णालय प्रशासनावर कोणती कठोर कारवाई होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील अवयव प्रत्यारोपण नियमावलीत मोठे बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 8:22 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
बनावट पत्नी, पैशाचा घोळ अन् फसवणूक; रूबी हॉल किडनी रॅकेटप्रकरणात वर्षभरानंतर धक्कादायक खुलासे








