पुण्यातील वृद्धाची आयुष्यभराची पुंजी सायबर चोरट्यांनी चोरली; कॅन्सरग्रस्त पत्नीचे उपचारही थांबले, शेवटी अनपेक्षित घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
निवृत्तीनंतरचे शांत आयुष्य जगणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध पती आणि ६५ वर्षीय पत्नीला सायबर चोरट्यांच्या क्रूर जाळ्याने घेरले. चोरट्यांनी त्यांच्या आयुष्यातील कष्टाची सर्व पुंजी एका क्षणात हिरावून घेतली.
पुणे : निवृत्तीनंतरचे शांत आयुष्य जगणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध पती आणि ६५ वर्षीय पत्नीला सायबर चोरट्यांच्या क्रूर जाळ्याने घेरले. चोरट्यांनी त्यांच्या आयुष्यातील कष्टाची सर्व पुंजी एका क्षणात हिरावून घेतली. मनी लाँड्रिंगच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची आणि अटकेची भीती दाखवून 'डिजिटल अरेस्ट'द्वारे या दाम्पत्याकडून तब्बल १९ लाख ६० हजार रुपये उकळण्यात आले होते. ही घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. ज्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या दाम्पत्याने सायबर सेल आणि कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित बँक खात्यांमधील रक्कम गोठवली खरी, परंतु यामुळे पीडित दाम्पत्याची आर्थिक कोंडी झाली. विशेषतः पत्नी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असल्याने उपचाराचा मोठा खर्च कसा भागवायचा? हा यक्षप्रश्न पतीसमोर उभा ठाकला होता.
आयुष्यभराची कमाई गमावल्यानंतर उपचारासाठीही पैसे उरले नसल्याने या ज्येष्ठ दाम्पत्याने ॲड. धवल दहिदुले यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात आपली कैफियत मांडली. पत्नीच्या उपचारांची तातडीची गरज आणि ज्येष्ठांची होणारी परवड लक्षात घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने तपासादरम्यान जप्त करण्यात आलेली १० लाख ५० हजार रुपयांची रक्कम अटी-शर्तींवर या दाम्पत्याला परत करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
ही रक्कम मिळवण्यासाठी दाम्पत्याला तितक्याच रकमेचा हमी बाँड न्यायालयात सादर करावा लागणार आहे. तसेच भविष्यात गरज पडल्यास ही रक्कम पुन्हा जमा करण्याची लेखी हमीही द्यावी लागेल. या निर्णयामुळे कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला असून, कष्टाचे पैसे परत मिळाल्याने या दाम्पत्याचे डोळे आनंदाने पाणावले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील वृद्धाची आयुष्यभराची पुंजी सायबर चोरट्यांनी चोरली; कॅन्सरग्रस्त पत्नीचे उपचारही थांबले, शेवटी अनपेक्षित घडलं








