दिवसभर दमलेला एकनाथ काम संपवून दुकानातच झोपला, पण त्याची सकाळ कधी झालीच नाही, पुण्यात मध्यरात्री काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शनिवारी रात्री काम संपवून तो दुकानातच झोपला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली.
पुणे : पुणे-नगर महामार्गावरील आव्हाळवाडी फाटा परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. या आगीत एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला आहे. एकनाथ दिलीप राठोड (वय २४, मूळ रा. भोकर, जि. नांदेड, सध्या रा. वाघोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुकानात लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे एकनाथचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
आव्हाळवाडी फाट्यावर साईन बोर्ड आणि रेडियम बोर्ड तयार करण्याचे एक दुकान आहे. या दुकानात एकनाथ राठोड हा कामगार म्हणून कार्यरत होता. शनिवारी रात्री काम संपवून तो दुकानातच झोपला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. दुकानातील प्लास्टिक, रेडियम आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकानात काळाकुट्ट धूर पसरला.
advertisement
झोपेतच काळाचा घाला
दुकानाला आग लागली तेव्हा एकनाथ गाढ झोपेत होता. आगीमुळे तयार झालेला विषारी धूर फुफ्फुसात गेल्याने त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि त्याचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आलेल्या या तरुण मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 1:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
दिवसभर दमलेला एकनाथ काम संपवून दुकानातच झोपला, पण त्याची सकाळ कधी झालीच नाही, पुण्यात मध्यरात्री काय घडलं?









