Mumbai News: मुंबईत घर घेणं परवडत नाही! तुम्हीच नाही, 81 टक्के लोक हेच म्हणतात, सर्व्हेतून पुढे आली धक्कादायक माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Real Estate: मुंबईत जागेचा तुटवडा, मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे कठीण झाले आहे.
मुंबई: मुंबईत घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. त्यामुळे मुंबईत घरांना मागणी देखील मोठी असते. परंतु, या मायानगरीत घर खरेदी करणं सर्वांनाच परवडतं असं नाही. तब्बल 81 टक्के लोकांचं हेच मत आहे. वास्तव ॲनारॉक रिअल इस्टेट कंपनीने एक सर्व्हे केला असून यातून धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. जानेवारी ते जून 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत 8,250 लोकांच्या ऑनलाईन प्रतिक्रियांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
मुंबईत जागेचा तुटवडा, मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे कठीण झाले आहे. सर्वेक्षणात असे आढळले की, “45 लाख रुपयांपर्यंतच्या घरांमध्ये केवळ 17 टक्के लोक रस दाखवत आहेत. पण अशा परवडणाऱ्या दरातील केवळ 12 टक्के प्रकल्पच प्रत्यक्षात उभे राहत आहेत. याउलट 62 टक्के लोकांना जे पर्याय उपलब्ध आहेत ते स्वीकारार्ह वाटत नाहीत. शिवाय तब्बल 92 टक्के लोकांना हवे असलेले घर इच्छित भागात मिळत नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.”
advertisement
90 लाख ते दीड कोटी रुपयांदरम्यानच्या घरांमध्ये 36 टक्के लोक रस दाखवत आहेत. तर 45 ते 90 लाखांमधील घरांमध्ये 25 टक्के लोकांना रस आहे. मात्र किंमत, स्थान, आणि घराचा आकारमान या तिन्ही गोष्टी लोकांसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत.
advertisement
दरम्यान, मुंबईत घर घेणे केवळ इच्छा असून भागत नाही तर त्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि योग्य पर्याय हवे आहेत. घरांच्या किमती गगनाला भिडत असतानाच परवडणाऱ्या घरांची टंचाई ही मोठी समस्या ठरत आहे, हेच या सर्व्हेतून पुढे आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 3:25 PM IST
मराठी बातम्या/रिअल इस्टेट/
Mumbai News: मुंबईत घर घेणं परवडत नाही! तुम्हीच नाही, 81 टक्के लोक हेच म्हणतात, सर्व्हेतून पुढे आली धक्कादायक माहिती