Diwali Padwa: का साजरा केला जातो दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा? धार्मिक महत्त्व जाणून घ्या
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Diwali Padwa: कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेच्याच दिवशी महाराष्ट्रात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. नवीन लग्न झालेल्यांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक मुहूर्ताचा दिवस आहे.
मुंबई, 14 नोव्हेंबर : दिवाळीतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा अर्थात बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेच्याच दिवशी महाराष्ट्रात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. नवीन लग्न झालेल्यांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक मुहूर्ताचा दिवस आहे. नवीन लग्न झाल्यानंतर त्या वर्षी येणारी पहिली दिवाळी विशेष असते. मुलीच्या माहेरी हा दिवाळसण साजरा करतात. जावयाला विशेष मान देऊन आहेर केला जातो. दिवाळी पाडव्याला पहाटे पत्नी त्याच्या पतीला सुगंधी तेल लावून, उटणं लावून स्नान घालते. संध्याकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी म्हणून काही तरी भेटवस्तू देतो.
वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी कायम नांदावी, नात्यातला गोडवा कायम राहावा आणि पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी औक्षणाची पद्धत आहे. तसंच घरातल्या अन्य पुरुषांनाही त्यांची पत्नी या दिवशी ओवाळते. फटाके वाजवले जातात. गोडधोड केलं जातं. मुलीच्या सासरकडच्यांना माहेरी जेवायला बोलावण्याचीही काही ठिकाणी पद्धत आहे. अनेक जण या दिवशी आवर्जून सोनं खरेदी करतात. रांगोळ्या काढल्या जातात, पणत्या लावल्या जातात.
advertisement
शक्ती आणि संपत्तीने प्रचंड मोठ्या झालेल्या बळीराजाला नमवण्यासाठी भगवान विष्णू आले. त्यांनी वामनावतार धारण करून तीन पावलांमध्ये बळीराजाकडे भूदान मागितलं. वामनाच्या तीन पावलांमध्ये सारं विश्व व्यापलं गेल्यामुळे बळीराजा पाताळात गेला. बळीराजाचा (Baliraja) दानशूरपणा पाहून विष्णूंनी त्याला वर दिला. ‘कार्तिक प्रतिपदेला तुझं स्मरण करून तुझी पूजा केली जाईल. जो कोणी या दिवशी दीपदान करेल, त्याला यमयातना भोगावी लागणार नाही आणि त्याच्याकडे सदैव लक्ष्मीचा वास राहील,’ असं वरदान विष्णूंनी बळीराजाला दिलं. त्यामुळे या दिवशी काही ठिकाणी बळीराजाचं त्याची पत्नी विंध्यवलीसह चित्र किंवा रांगोळी काढून पूजा केली जाते. ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. भगवान विष्णूंनी बळीराजाला नमवल्यानंतर लक्ष्मीला त्यांचं कौतुक वाटलं आणि तिनं त्यांचं औक्षण केलं. भगवान विष्णूंनी ओवाळणी म्हणून लक्ष्मीचं तबक हिरेमाणकांनी भरून टाकलं असं म्हणतात. त्याचीच आठवण म्हणून पत्नी या दिवशी पतीचं औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी घालतो. काहीजण या दिवशी वस्त्र आणि दिव्याचं दान देतात.
advertisement
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला विक्रम संवत्सराची सुरुवात होते. उज्जैनचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं. त्या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत्सर ही कालगणना सुरू केली. या दिवसाबद्दल आणखी कथाही प्रसिद्ध आहे. पार्वतीने शंकरांना या दिवशी द्युतात हरवलं होतं. त्यामुळे काही ठिकाणी या दिवशी द्यूत किंवा आता काळानुसार पत्ते खेळण्याचीही प्रथा आहे.
advertisement
दिवाळी पाडवा हा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. याच दिवशी व्यापाऱ्यांचं नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. हिशेबाच्या नव्या वह्यांची हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात करतात. त्यांच्या जमाखर्चाच्या नवीन वह्या वापरायला याच दिवसापासून सुरुवात होते.
दिवाळीपर्यंत नवीन पिकं हाती आलेली असतात. त्यामुळे दिवाळी हा शेतकऱ्यांसाठी विशेष आनंदाचा सण असतो. दिवाळी पाडव्याला पहाटे ग्रामीण भागात शेतकरी डोक्यावर घोंगडी घेऊन शेतात जातात आणि दिवा लावतात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 14, 2023 7:57 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Diwali Padwa: का साजरा केला जातो दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा? धार्मिक महत्त्व जाणून घ्या








