Holi 2025: होळी का साजरी करतात माहितीये? पाहा महत्त्व, मान्यता आणि वैज्ञानिक कारण!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Holi 2025: हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे. त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होते. होळीची मान्यता आणि महत्त्व जाणून घेऊ.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : रंगांचा सण म्हणजेच होळी. हा सण भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणून ओळखला जातो. दिवाळीनंतर येणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या सणाला विविध फुगे, फुले आणि रंग उधळून साजरा केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सणाला फार मोठे महत्त्व आहे. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5 – 6 दिवसांत कुठे 2 दिवस तर कुठे 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. आज आपण लोकल 18 च्या माध्यमातून मंदिर आणि शास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा यांच्याकडून जाणून घेऊया होळी सणाचं वैज्ञानिक आणि अध्यात्मिक महत्व काय आहे..
advertisement
उत्तर भारतात या सणाला ‘ होरी - दोलायात्रा ‘ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘ कामदहन ‘ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘होळी किंवा शिमगा’ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण- गोमंतकात या सणाला ‘शिग्मा किंवा शिग्मो ‘ असे म्हणतात. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ’ म्हणजे ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘शिग्मा’ हा शब्द रूढ झाला . त्यानंतर त्याचे ‘शिमगा’ असे झाल्याचे राणिंगा सांगतात.
advertisement
हिंदू धर्मात सण उत्सावांना अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सव आणि व्रतामागे धर्म शास्त्रात कारण देण्यात आलंय. भारतात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येतात. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे. त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल. होलिका दहन आणि होळीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळीचा सण पौर्णिमेच्या तिथीनुसार आणि होलिका दहनाच्या शुभ मुहूर्तानुसार निश्चित केला जातो. वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता संपेल. उदयतिथीमुळे, रंगांची होळी 14 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे.
advertisement
होळीची कहाणी
प्रत्येक सणाप्रमाणेच होळी सण साजरा करण्यामागे देखील एक आख्यायिका सांगितली जाते. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद तरीही भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
advertisement
या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली. बहीण होलिका हिला आगीवर विजय प्राप्त होईल, असं वरदान मिळालं होतं. तिला आगही जाळू शकत नव्हती. राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली. ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही. मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला.
advertisement
रंगांची उधळण का केली जाते?
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगांची होळी खेळतो. पूर्वीच्या काळी हे रंग नैसर्गिक असायचे. ते फळं, फुलं आणि भाज्यांपासून तयार केले जायचे. चंदन, हळद आणि मुलतानी मातीपासून तयार केले रंग असायचे. जेव्हा हे रंग एकमेकांच्या चेहऱ्यावर लावले जायचे. त्यामुळे आपल्या त्वचेच संरक्षण व्हायचं. भारतातील सणाची ही सुंदरता आणि महत्त्वपूर्ण गोष्टी फारच क्वचित लोकांना माहिती आहे. या सणांमागील वैज्ञानिक कारण कळल्यानंतर त्या सणाचा आनंद अजून द्विगुणीत होतो.
advertisement
काय आहे वैज्ञानिक कारण ?
होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात येतो. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी. अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन काळापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आता लोक सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याकडे पाहतात.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 06, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Holi 2025: होळी का साजरी करतात माहितीये? पाहा महत्त्व, मान्यता आणि वैज्ञानिक कारण!