गुरवाला असतो पत्रावळीचा मान, सांगलीच्या गावभागात घटस्थापनेची अनोखी परंपरा
- Published by:News18 Marathi
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
नवरात्री हा आदिशक्तीचा उत्सव कृषी संस्कृतीशी नाते जोडणारा आहे. सांगलीतील ग्रामीण भागामध्ये आजही घटाची स्थापना पारंपरिक पद्धतीने केली जाते.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शरद ऋतूची चाहूल घेऊन येणाऱ्या नवरात्राला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते. या नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रतिपदेला कलशामध्ये माता दुर्गाला आवाहन करून केली जाते. ही घटस्थापना करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असल्याचे पहायला मिळते. काही ठिकाणी देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काहीजण धातूचे किंवा मातीचे कलश मांडतात. सांगलीच्या गाव भागामध्ये पळसाच्या पानांवरती पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्याची पद्धत आहे. या परंपरेविषयी स्थानिक पुजारी संदिप गुरव यांनी माहिती दिलीये.
advertisement
पत्रावळीत होते घटस्थापना
सांगलीत गावभागात पूर्वीपासून पत्रावळीमध्ये घट बसविण्याची परंपरा आहे. पूर्वी टेंभूर्णी, वड, केळीच्या पानांपासून आम्ही पत्रावळ्या वळत होतो. मात्र अलिकडे टेंभूर्णी, बिब्यासह वडाची झाडे कमी झाली आहेत. सध्या केवळ पळसाच्या पानांच्या पत्रावळी तयार कराव्या लागतात. संपूर्ण गावातील लोकांना आम्ही पत्रावळी देतो. यामध्येच लोक घटस्थापना करतात. पूर्वापार चालत आलेली परंपरा आम्ही आजही जपली आहे, असे गुरव सांगतात.
advertisement
गुरवाला पत्रावळीचा मान
नवरात्र हा आदिशक्तीचा सण कृषी संस्कृतीशी नाते जोडणारा आहे. सांगलीतील ग्रामीण भागामध्ये आजही घटाची स्थापना करण्यासाठी पारंपरिक पत्रावळ्या वापरल्या जातात. या पत्रावळी गावातील गुरवांकडून तयार केल्या जातात. "आमच्या गावात पूर्वापार पळसाच्या पानांवरच घटस्थापना केली जाते. मंदिरातही हीच परंपरा कायम आहे. घटस्थापनेसाठी लागणारी पत्रावळी आम्ही बाजारातून आणत नाही. तर गुरव ही पत्रावळी बनवून देतात. तसेच गावातील प्रत्येक घरापर्यंत तेच पत्रावळी पोहोचवतात," असे स्थानिक शिवाजी भोकरे यांनी सांगितले.
advertisement
अशी बनते पत्रावळी
प्रतिपदेच्या 2 दिवस आधीपासूनच गुरव पळसाची पाने आणतात. सोबतच शाळूच्या सरकाळ्या, मक्याची चिपाडे या काड्यांचा पाने विनण्यासाठी उपयोग करतात. शक्य तितक्या लोकांना पत्रावळी आणि सप्तधानाचे मिश्रण गुरव लोक पोहोच करतात. तसेच अनेक लोक प्रतिपदेच्या दिवशी गुरवांच्या वाड्यावरती जाऊन पत्रावळी आणि सप्तधान्य श्रद्धेने घेऊन जातात.
advertisement
कशी होते घटस्थापना?
पळसाच्या पानांच्या पत्रावळीमध्ये पळसाच्याच पानाचा टोप ठेवून त्यामध्ये आपापल्या शेतातील वावरी म्हणजेच माती घालतात. मातीमध्ये सप्तधान्य पेरून त्यावरती मातीच्या कलशाची स्थापना करतात. विड्याची पाने आणि नारळाने घटस्थापनेचा विधी पूर्ण होतो. मार्केटमध्ये कितीही कागदी आणि प्लास्टिकच्या पत्रावळ्या आल्या तरी सांगलीच्या गावभागाने मात्र अजूनही पळसाच्या पानांच्या पत्रावळीवरतीच घटस्थापना करण्याची परंपरा जपल्याचे पहायला मिळते.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
October 04, 2024 10:38 AM IST