Pithori Amavasya: 22 की 23 ऑगस्ट, पिठोरी अमावस्या नेमकी कधी? पाहा पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. तिथी, पूजा-विधी आणि व्रत यांबाबत जाणून घेऊ.
मुंबई : श्रावण महिना संपून भाद्रपद महिना सुरू होताना पिठोरी अमावस्या असते. यंदा 22 ऑगस्टला दर्श पिठोरी अमावस्या साजरी होणार आहे. पितरांचे पूजन, तर्पण आणि दान करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या अमावस्येच्या निमित्ताने पवित्र नद्यांमध्ये स्नान करून श्राद्ध व तर्पण करण्याची परंपरा आहे. या अमावस्येच्या दिवशी काय करावं? तसंच या दिवशी मातृ सेवा विशेष का मानली जाते? याबद्दल मुंबईतील आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
अमवास्या कधी?
पंचांगानुसार, अमावस्या तिथी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 11.57 वाजता सुरू होईल आणि ती 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11.37 वाजेपर्यंत राहील. मात्र 22 ऑगस्ट रोजी मध्यान्हकाळी अमावस्या असल्याने याच दिवशी पिठोरी अमावस्या पाळली जाणार आहे, असे जोशी गुरुजी सांगतात.
advertisement
पिठोरी अमावस्या कशी साजरी करतात?
या दिवशी सुहासिनी महिला पिठाच्या मूर्ती तयार करून बाळाच्या जन्मासाठी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. दुर्गामाता आणि 64 योगिनींच्या मूर्ती पीठ मळून बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी केलेले उपवास, पूजन व नैवेद्य घरातील मुलांच्या सुख-समृद्धीसाठी शुभ मानले जाते. विशेष म्हणजे, या अमावस्येला सर्व पदार्थ पिठाचेच बनवले जातात. त्यामुळेच याला 'पिठोरी अमावस्या' असे नाव पडले आहे. अनेक घरांमध्ये भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो.
advertisement
मातृत्वाला वंदन करण्याचा दिवस
पिठोरी अमावस्येला ‘मातृदिन’ असेही संबोधले जाते. सामान्यतः अमावस्या अशुभ मानली जाते, परंतु या दिवशी केलेले व्रत अत्यंत मंगलकारी ठरते. आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य व कल्याणासाठी करायचे हे व्रत असल्याने त्याला मातृदिनाचे स्वरूप आले आहे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक नातेसंबंधासाठी एक खास दिवस निश्चित केला आहे. त्यामधीलच हा मातृत्वाला वंदन करणारा दिवस असल्याने या अमावस्येला विशेष स्थान आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2025 12:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Pithori Amavasya: 22 की 23 ऑगस्ट, पिठोरी अमावस्या नेमकी कधी? पाहा पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व