Ashadhi Wari 2025: अन् अमरावतीच्या मंदिरात श्रीकृष्णाने रुख्मिणी मातेसोबत केला विवाह, 431 वर्षांची कौंडिण्यपूर मानाची पालखी, आख्यायिका VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी विठू माऊली स्वतः भक्ताच्या भेटीला येत असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे कौंडिण्यपूर म्हणजे विदर्भाचे पंढरपूर असं म्हटलं जातं.
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौंडिण्यपूर हे विदर्भातील पंढरपूर आहे, असं म्हटलं जातं. वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर मंदिर आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी विठू माऊली स्वतः भक्ताच्या भेटीला येत असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे कौंडिण्यपूर म्हणजे विदर्भाचे पंढरपूर असं म्हटलं जातं. या गावाला खूप मोठा इतिहास लाभलेला असल्याचं येथील ग्रामस्थ सांगतात. भगवान श्रीकृष्णाने माता रुक्मिणीचे देखील याच पावन भूमीतून केल्याचं येथील ग्रामस्थ सांगतात.
पंचसखींचे माहेरघर कौंडिण्यपूर
श्री क्षेत्र कौंडिण्यपूरबाबत माहिती देताना ग्रामस्थ संदीप बोबडे सांगतात की, कौंडिण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेर आहे. तसेच प्रभु रामचंद्राची आजी, राजा दशरथाची आई इंदुमती, नलराजाची राणी दमयंती, श्री अगस्त्य ऋषीची पत्नी लोपामुद्रा, भगीरथ राजाची माता केशिनी, या पंचसखींचे देखील हे माहेर आहे.
advertisement
रुक्मिणी हरणाची आख्यायिका काय?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचं हरण देखील कौंडिण्यपूर येथूनच केलं होतं. रुक्मिणी मातेच्या मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर पुरातन असं जागृत अंबिका मातेचे मंदिर आहे. रुक्मिणी मातेला भगवान श्रीकृष्णाने याच मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी बोलावले होते. त्याच मंदिरातील जवळच्या भुयार मार्गाने रुक्मिणीचे हरण केले. त्यावेळी येथे घनघोर युद्ध झाले आणि त्यात रुक्मिणी आणि शिशुपालाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात रुक्मिणी मातेसोबत विवाह केल्याची आख्यायिका आहे.
advertisement
पंढरपूर पायदळ दिंडी सोहळ्याची 431 वर्षांची परंपरा
कौंडिण्यपूर येथील मानाची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. श्री. संत सद्गुरू सदाराम महाराजांनी या पालखीची परंपरा सुरू केली होती. या पायदळ दिंडी सोहळ्यास 431 वर्षांचा इतिहास आहे. श्री. रुक्मिणी मातेच्या पालखीला पंढरपुरात विशेष मान आहे. मानाच्या नऊ पालख्यांमधील मातेची पालखी असून ही विदर्भातील एकमेव मानाची पालखी आहे. सन 1594 साली सुरू केलेली ही आजही कायम आहे. श्री संत सद्गुरू सदाराम महाराजांना वृद्धापकाळामुळे वारी कठीण झाली. त्यावेळी स्वतः पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की, मी स्वतः कौंडिण्यपूर येथे तुझ्या भेटीस दरवर्षी कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला येत जाईन. तेव्हापासून कार्तिक मासामध्ये कौंडिण्यपूर येथे फार मोठी यात्रा भरते आणि कार्तिक शु. प्रतिपदेला दहीहंडी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतो, असे त्यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 21, 2025 7:49 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Ashadhi Wari 2025: अन् अमरावतीच्या मंदिरात श्रीकृष्णाने रुख्मिणी मातेसोबत केला विवाह, 431 वर्षांची कौंडिण्यपूर मानाची पालखी, आख्यायिका VIDEO