शिखर शिंगणापुरात शंभू महादेवाची यात्रा, मुंगी घाटातील कावडींचा थरार पाहिला का? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
साताऱ्यापासून पूर्वेकडे 90 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गुढी पाडव्यापासून येथील यात्रेला सुरुवात होते.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. हे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचेसह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पारंपारिक पध्दतीने होतो. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.
कशी असते यात्रा?
साताऱ्यापासून पूर्वेकडे 90 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गुढी पाडव्यापासून येथील यात्रेला सुरुवात होते. ही यात्रा म्हणजे शंभू महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा असतो. पाडव्याच्या मुहूर्तावर हळदी लावण्याचा कार्यक्रम होतो आणि चैत्र शुध्द पंचमीस श्रींचा विवाह सोहळा असतो. एकादशी आणि बारस हे यात्रेचे मुख्य दिवस असतात.
advertisement
मुंगी घाटातून चढवली जाते कावड
चैत्र शुध्द बारसला दुपारी अवघड अशा मुंगी घाटातून कावडी चढविण्याचा साहसी कार्यक्रम सुरु होतो. यंदा यात्रेच्या मुख्य दिवशी हा मुंगी घाटातील थरार सर्व भाविकांनी अनुभवला. यावेळी विविध गावच्या मानाच्या कावडी एकापाठोपाठ मुंगी घाटातुन दोरखंडाच्या आणि हाताच्या मानवी साखळी करुन घाटातून चढविल्या. यादरम्यान भाविकांचा चांगलाच कस लागलेला पाहायला मिळतो. या कावडी गडावर आल्या की त्या वाजत गाजत आणि नाचवत मंदिराकडे जातात. कावडीमधून आणलेल्या पाण्याने शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितले.
advertisement
तेल्याभुत्याची मानाची कावड
शुंभू महादेवाच्या यात्रेसाठी मुंगी घाटातून हजारो कावडी येतात. सासवड येथील तेल्याभुत्याची कावड ही मानाची मानली जाते. ती सगळ्यात शेवटी रात्री उशिरा गडावर पोहोचते. त्याच्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. ही कावड हाताची मानवी साखळी करून घाटातून वर चढवली जाते. रणरणत्या उन्हात कावडी घेऊन ‘हर हर महादेव’चा जयघोष करत शिवभक्तांनी शिखर शिंगणापूर येथील अवघड मुंगी घाट सर केला. सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यात भरणाऱ्या या यात्रेला यंदा दुष्काळाचे सावट असतानाही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
April 21, 2024 11:42 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
शिखर शिंगणापुरात शंभू महादेवाची यात्रा, मुंगी घाटातील कावडींचा थरार पाहिला का? Video