कपिलनीही वर्ल्ड कपमध्येच केले होते 175 रन, वैभवची बॅटिंग बघितली, पण ग्रेट कॅप्टनची खेळी TV-युट्युबवर का नाही?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने 175 रनची वादळी खेळी केली. वैभवच्या आधी कपिल देव यांनीही वर्ल्ड कपमध्ये 175 रन केले होते, पण या खेळीचं व्हिडिओ रेकॉर्डिंगच झालं नाही.
मुंबई : अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पहिले बॅटिंग करताना 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून तब्बल 411 रन केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने 80 बॉलमध्ये 218.75 च्या स्ट्राईक रेटने 175 रनची ऐतिहासिक खेळी केली. वैभवने त्याच्या या वादळी खेळीमध्ये 15 फोर आणि 15 सिक्स ठोकले. अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे.
वैभव सूर्यवंशीच्या 175 रनच्या खेळीप्रमाणेच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही वनडे वर्ल्ड कपमध्ये 175 रनचीच ऐतिहासिक खेळी केली होती. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांनी 138 बॉलमध्ये नाबाद 175 रन केले होते, ज्यात 16 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. वर्ल्ड कपच्या इतिहासातली ही सर्वोत्तम खेळीपैकी एक मानली जाते, पण दुर्दैवाने कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध नाही.
advertisement
1983 च्या वर्ल्ड कपमधील झिम्बाब्वेविरुद्धचा विजय हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सगळ्यात मोठ्या कामगिरीपैकी एक आहे. 18 जून 1983 रोजी ट्युनब्रीज वेल्स मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांनी टीम इंडिया अडचणीत असताना नाबाद 175 रन केले. भारताची अवस्था 9 रनवर 4 विकेट अशी झालेली असताना कपिल देव मैदानात उतरले आणि त्यांनी 60 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 266/8 पर्यंत नेला. यानंतर हा सामना भारताने 31 रननी जिंकला. तसंच पुढे जाऊन भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्येही विजय मिळवला.
advertisement
1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांची ही खेळी फक्त स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाच पाहायला मिळाली, कारण हा सामना लाईव्ह रेकॉर्डच झाला नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये बीबीसी एकमेव प्रसारक होते, पण बीबीसीच्या कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे या सामन्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग केलं गेलं नाही.
कपिल देव यांनी 175 रनच्या या खेळीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग न झाल्याबद्दल आपल्याला कोणताही पश्चात्ताप नसल्याची प्रतिक्रिया दिली. 'मला लोकांवर टीका करायला आवडत नाही. लोक म्हणतात तुम्हाला वाईट वाटत नाही का? कारण त्या खेळीचा व्हिडिओ उपलब्ध नाही, पण मी कायमच नाही म्हणून उत्तर देतो. ही खेळी माझ्या डोक्यात रेकॉर्ड केलेली आहे', असं कपिल देव म्हणाले. 175 रनची खेळी तुमची सर्वोत्तम खेळी होती का? असं विचारलं असता, ती महत्त्वाची खेळी होती, असं उत्तर कपिल देव यांनी दिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 6:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कपिलनीही वर्ल्ड कपमध्येच केले होते 175 रन, वैभवची बॅटिंग बघितली, पण ग्रेट कॅप्टनची खेळी TV-युट्युबवर का नाही?








