T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूंना एकटंच राहावं लागणार, टीम इंडियाची 'ती' मागणी फेटाळली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युएसएविरुद्ध विजय झाला आहे, त्यानंतर आता भारतीय टीमचा पुढचा सामना गुरूवारी नवी दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्ध होणार आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युएसएविरुद्ध विजय झाला आहे, त्यानंतर आता भारतीय टीमचा पुढचा सामना गुरूवारी नवी दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्ध होणार आहे, पण टी-20 वर्ल्ड कप सुरू असतानाच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना धक्का दिला आहे. वर्ल्ड कपदरम्यान भारतीय खेळाडूंना कुटुंबाला सोबत आणण्याची विनंती बीसीसीआयला केली होती, पण ही विनंती बीसीसीआयने फेटाळून लावली आहे.
सध्याच्या नियमांनुसार, टीम इंडियाचा दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त असेल तर खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी कुटुंबियांना सोबत आणण्याची परवानगी आहे. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने बीसीसीआयकडे खेळाडूंच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्याबाबत स्पष्टता मागितली होती. कुटुंब खेळाडूंसोबत राहणार नाहीत, पण खेळाडूंची इच्छा असल्यास ते कुटुंबासोबत वेगळी व्यवस्था करू शकतात, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
advertisement
टीम इंडियाची मागणी, बीसीसीआयचा नकार
द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, भारतीय टीम मॅनेजमेंटने बीसीसीआयला खेळाडूंना वर्ल्ड कपदरम्यान त्यांच्या पत्नी/गर्लफ्रेंडसोबत प्रवास करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. पण, बीसीसीआयने त्यांच्या मागील निर्णयावर ठाम राहून ही विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली. बोर्डाने स्पष्ट केले की खेळाडू इच्छित असल्यास त्यांच्या कुटुंबियांसह स्वखर्चाने प्रवास करू शकतात, पण टीमच्या अधिकृत योजनांमध्ये कुटुंबियांचा समावेश केला जाणार नाही.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पराभवानंतर नवीन नियम
ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयने एक नवीन धोरण तयार केले. त्यावेळी जारी केलेल्या 10 कलमी मार्गदर्शक तत्वांमध्ये परदेश दौऱ्यांवर कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. नियमात स्पष्टपणे म्हटले होते की खेळाडू 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यांवर जास्तीत जास्त एका आठवड्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत ठेवू शकतात. हा नियम खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना समान प्रमाणात लागू करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 6:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूंना एकटंच राहावं लागणार, टीम इंडियाची 'ती' मागणी फेटाळली!










