Suryakumar Yadav : वर्ल्ड कप विजयानंतरही सूर्याची दिलगिरी सुरूच, अक्षरनंतर आणखी एका खेळाडूची माफी मागितली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवला दुसऱ्यांदा माफी मागावी लागली आहे.
मुंबई : टीम इंडियाने लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारली. याचसोबत सूर्यकुमार यादव हा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवला दुसऱ्यांदा माफी मागावी लागली आहे.
याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेलला टीमबाहेर ठेवून वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती, पण त्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का लागला, त्यानंतर टीम इंडियाच्या रणनीतीवर टीकेची झोड उठली, अखेर कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलगिरी व्यक्त केली आणि पुढच्याच सामन्यात अक्षर पटेलचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं, एवढंच नाही तर अक्षरने भारताला लागोपाठ दुसरा वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
advertisement
अक्षर पटेलनंतर आता सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचीही माफी मागितली आहे. सूर्यकुमार यादवने पीटीआयला मुलाखत दिली आहे, ज्यात त्याने संजूसोबत अन्याय झाल्याचं अप्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
'संजू जेव्हा टीममध्ये आला तेव्हा सगळं काही बदललं. संजूला टीममध्ये घेणं हा टॅक्टिकल डिसिजन होता, कारण टॉप-3 बॅटर हे डावखुरे होते, त्यामुळे विरोधी टीमला सोपं जात होतं. विरोधी टीमचे ऑफ स्पिनर आणि पार्ट टाईम बॉलरही बॉलिंग करत होते. विरोधी टीमला हा फायदा मिळू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
'संजू पडद्यामागे खूप मेहनत घेत होता. तो कशातून जात आहे, हे कुणालाही माहिती नव्हतं. तो खेळला आणि त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. तो फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही महान आहे. चांगल्या लोकांसोबत चांगलं होतं', असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं.
'संजूला त्याची बॅटिंग पोजिशन बदलावी लागली, त्यानंतर त्याला टीममधूनही बाहेर जावं लागलं, यामुळे खेळाडूही डिस्टर्ब होतो. वेगळ्या क्रमांकावर खेळणं किती कठीण असतं, हे मला माहिती आहे. तुम्हाला हे आवडत नसतं, तरी तुम्हाला टीमसाठी करावं लागतं, मी ऑस्ट्रेलियामध्ये त्याला हेच सांगितलं. मी संजू सॅमसनची माफी मागितली. मीदेखील टीमसमोर ठेवून विचार करतो. टीम जिंकावी हेच ध्येय असतं. टीमला गरज असताना संजू खेळेल, हे विधिलिखत होतं', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 10:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : वर्ल्ड कप विजयानंतरही सूर्याची दिलगिरी सुरूच, अक्षरनंतर आणखी एका खेळाडूची माफी मागितली!








