पुणे : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा पासून केली जाते. गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून पुण्यातील बाजारपेठांमध्ये सणाची लगबग सुरू झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठांकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः पुण्यातील मंडई परिसरात गुढीचे साहित्य, साखरेच्या गाठी आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजलेली पाहायला मिळत आहे.



