Iran War: उरले फक्त 48 तास, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट धमकी, जगाची धाकधूक वाढली
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मध्यपूर्वेतील तणाव आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत तंबी दिली आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत तंबी दिली असून, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी केवळ ४८ तासांची मुदत दिली आहे. ही कालमर्यादा पाळली नाही, तर इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा
काही दिवसांपूर्वीपर्यंत मवाळ भूमिका घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक आपला सूर बदलला आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत आक्रमक भाषेत पोस्ट लिहीत त्यांनी म्हटले की, "वेळ वेगाने संपत आहे. इराणला करारासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. आता फक्त ४८ तास शिल्लक आहेत. जर ही डेडलाईन ओलांडली गेली, तर अमेरिका इराणवर कहर बनून तुटून पडेल."
advertisement
विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी यापूर्वी ही मुदत १० दिवसांनी वाढवून ६ एप्रिलपर्यंत केली होती, ज्यामुळे राजनैतिक मार्गाने तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, आता त्यांच्या बदललेल्या पवित्र्यामुळे मध्य पूर्वेतील हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गापैकी एक मानला जातो. जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो. जर हा मार्ग रोखला गेला, तर त्याचा फटका केवळ प्रादेशिक नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेला बसेल. त्यामुळेच अमेरिका या विषयाकडे केवळ प्रादेशिक वाद म्हणून न पाहता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जा स्थिरतेचा प्रश्न म्हणून पाहत आहे.
advertisement
'ऑपरेशन एपिक फ्युरी' आणि सद्यस्थिती
२८ फेब्रुवारी रोजी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या सोबतीने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) सुरू केले, तेव्हा त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होतं. इराणची क्षेपणास्त्र शक्ती नष्ट करणं आणि त्यांच्या अणू कार्यक्रमाला कायमचा लगाम घालणे. मात्र, युद्धाच्या पाचव्या आठवड्यात हे लक्ष्य गाठणे अमेरिकेसाठी आव्हानात्मक ठरताना दिसत आहे.
advertisement
इराणकडून अद्याप या ४८ तासांच्या इशाऱ्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, ज्या पद्धतीने अमेरिकेने आपली आक्रमकता वाढवली आहे, ते पाहता पुढील दोन दिवस संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जर तोडगा निघाला नाही, तर मध्यपूर्वेत भीषण संघर्ष पेटण्याची शक्यता वाढताना दिसत आहे.
Location :
Delhi
First Published :
Apr 05, 2026 7:06 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: उरले फक्त 48 तास, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट धमकी, जगाची धाकधूक वाढली







