Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Agriculture Success: सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतीत वेगळे प्रयोग करत असतात. सोलापुरातील नववी पास शेतकरी शेवगा शेतीतून करोडपती झाला आहे.
सोलापूर – अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी बऱ्याचदा पिचलेला असतो. परंतु, तरीही हार न मानता काही शेतकरी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने यशाची उत्तुंग झेप घेतात. अशीच काहीशी कहाणी सोलापूर जिल्ह्यातील एका नववी पास शेतकऱ्याची आहे. घरची गरिबी आणि छपराच्या घरात राहणाऱ्या या शेतकऱ्याला नववीतून शाळा सोडावी लागली. परंतु, त्यानंतर शेवगा शेतीनं त्यांचं नशीबच पालटलं. आता उपळाई खुर्दचे शेतकरी बाळासाहेब पाटील हे करोडपती असून त्यांच्यावर एक पुस्तक देखील प्रकाशित झालंय. याच शेतकऱ्याची यशोगाथा लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
माढा तालुक्यात सर्वात मोठं उजनी धरण आहे. याच तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे शेतकरी बाळासाहेब पाटील यांचं गाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि घर छपराचं अशी स्थिती असतानाच त्यांना नववीतून शाळा सोडावी लागली. तेव्हा त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘धरण उशाला कोरण घशाला’ अशी स्थिती होती. पाणी नसल्याने शेती कोणती करावी, असा प्रश्न त्यांना पडलेला होता. तेव्हा त्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची माहिती घेतली आणि शेवगा शेतीचा पर्याय निवडला. सुरुवातीला एका एकरात त्यांनी शेवगा पिकाची लागवड केली.
advertisement
वर्षाला लाखोंची कमाई
एका एकरात लागवड केलेल्या शेवगा शेतीतून बाळासाहेब पाटील यांना चांगला नफा मिळाला. त्यामुळे गेल्या बारा वर्षापासून ते 5 एकरात शेवगा शेती करत आहेत. त्यानंतर शेवग्याच्या बिया बनवून त्या विकण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. आज ते संपूर्ण देशभरात शेवगा बियाण्यांची विक्री करत आहे. तर स्वतःचा राम गणेश बियाणे म्हणून ब्रँड देखील उभा केला आहे. या व्यवसायातून नववीपर्यंत शिक्षण घेतलेले बाळासाहेब पाटील हे वर्षाला 25 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
advertisement
बाळासाहेब पाटील यांनी शेवगा शेतीतून मिळालेल्या यशामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तर त्यांच्यावर डॉ. सचिन चंद्रकांत फुगे यांनी ‘शेवग्याच्या झाडातून देशयात्रा’ असे पुस्तक देखील लिहिले आहे. बाळासाहेब यांच्यावर लिहिलेले पुस्तक हे इतर शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरत आहे. या पुस्तकामध्ये शेवगा लागवडीपासून ते येणारा सर्व खर्चापर्यंत माहिती उपलब्ध आहेत.
advertisement
दरम्यान, घरासमोर किंवा शहरात सहज मिळणाऱ्या या शेवगा शेतीतून एखादा शेतकरी करोडपती बनू शकतो हे बाळासाहेब पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नववी पास शेतकऱ्याचा हा प्रवास युवा शेतकऱ्यांची नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 19, 2025 3:11 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!