Ativrushti Anudan : अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत शासनाचा नवा निर्णय! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
अकोला : मागील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेषतः अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतमालाची नासधूस होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असून, 18 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण 79 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही रक्कम थेट संबंधित 56 हजार 648 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये 56 हजार 700 शेतकऱ्यांचे तब्बल 57 हजार 371 हेक्टर क्षेत्र पूर आणि पावसाच्या तडाख्यात सापडले. तसेच 48 शेतकऱ्यांच्या एकूण 30 हेक्टर क्षेत्रातील जमीन खरडून गेली होती. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अडचणीत सापडले होते.
advertisement
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत 21 मार्चपासून शासनाच्या 'ई-पंचनामा पोर्टल'वर या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर ही मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग केली जाईल.
यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की, "राज्य शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. लवकरच या शेतकऱ्यांना त्यांची नुकसानभरपाई मिळेल."
advertisement
या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून, पुढील हंगामासाठी त्यांना आधार मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 25, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Ativrushti Anudan : अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत शासनाचा नवा निर्णय! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे येणार