अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनींसाठी निकष बदलणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिक, जनावरे, घरे आणि शेती साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे.
धाराशिव : जिल्ह्यात परंडा आणि भूम तालुक्यांमध्ये आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिक, जनावरे, घरे आणि शेती साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. २४) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा तालुक्यातील करंजा गावातील शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट दिली. या वेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नुकसानाचे सविस्तर आढावा घेतला.
निकष बदलले जाणार
advertisement
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, "पूरामुळे शेतजमिनी खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या निकषांनुसार शेतजमीन खरडल्यावर केवळ हेक्टरी ४७ हजार रुपये भरपाई दिली जाते. हा भरपाईचा दर शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अपुरा आहे. त्यामुळे हे निकष बदलून शेतकऱ्यांना योग्य आणि समाधानकारक भरपाई दिली जाईल."
advertisement
करंजा गावातील शिंदेवस्तीतील पूरग्रस्त चांगदेव शिंदे यांच्या घराचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी बाधित ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी केली असता, "सरकार निश्चितच पुनर्वसन करेल," असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
शिंदे पुढे म्हणाले, "बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तातडीने तात्पुरती मदत दिली जाईल. पंचनामे करून मदतीचे वितरण करण्यात येईल. यावेळी अटी-निकषांपेक्षा मानवी दृष्टिकोनातून सरकार निर्णय घेईल. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत."
advertisement
पूरग्रस्त भागातील शेतकरी व ग्रामस्थांच्या भावना जाणून घेताना शिंदे यांनी सांगितले की, "राजकारण बाजूला ठेवून सर्वांना न्याय्य मदत मिळेल. नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदतीचा हात दिला जाईल."
या दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. विशेषतः जमिनी खरडून गेल्याने पिके पुन्हा घेणे अशक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शासनाकडून अधिक दराने भरपाई आणि पुनर्वसन हे त्यांचे मुख्य मागणीचे मुद्दे होते.
advertisement
राज्य सरकारने पूरग्रस्त भागासाठी व्यापक मदतयोजना आखण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. निकष बदलून अधिक भरपाई, पुनर्वसन आणि तातडीच्या मदतीची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनींसाठी निकष बदलणार