फक्त १० टक्के रक्कम भरा अन् सरकारकडून सौर कृषी पंप मिळवा, ते कसं? वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Saur Krushi Pump Yojana : शेतकऱ्यांना अखंड सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
मुंबई : शेतकऱ्यांना अखंड सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो आणि उर्वरित खर्च केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिला जातो. वीजबिल, लोडशेडिंग आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळाल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
योजनेचे मुख्य फायदे
या सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांना सौर पॅनेल, पंप आणि आवश्यक उपकरणांचा संपूर्ण संच दिला जातो. जसे की, वीजबिल शून्य दिवसा सिंचनाची सोय, पाच वर्षांची दुरुस्ती व देखभाल हमी, विमा संरक्षण, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन उपाय यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.
१० टक्के हिस्सा कोणासाठी?
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना पंपाच्या एकूण किमतीपैकी १० टक्के रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा केवळ ५ टक्के आहे. उर्वरित रक्कम सरकारकडून थेट अनुदानाच्या स्वरूपात दिली जाते.
advertisement
जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप क्षमता
शेतजमिनीच्या आकारानुसार सौर कृषी पंपाची क्षमता निश्चित करण्यात आली आहे.
२.५ एकरपर्यंत जमीन – ३ अश्वशक्तीचा पंप
२.५१ ते ५ एकर – ५ अश्वशक्तीचा पंप
५ एकरपेक्षा अधिक जमीन – ७.५ अश्वशक्तीचा पंप
शेतकऱ्याने इच्छित असल्यास पात्रतेपेक्षा कमी क्षमतेचा पंप घेण्याची मुभा देखील आहे.
कोण शेतकरी पात्र ठरणार?
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल, शेततळे किंवा बारमाही पाण्याचा स्रोत आहे, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. वैयक्तिक तसेच सामुदायिक पाणीस्रोत असलेले शेतकरी अर्ज करू शकतात. मात्र, जलसंधारण प्रकल्पांमधील साठवलेल्या पाण्यावर ही योजना लागू नाही.
advertisement
अर्ज करण्याची प्रक्रिया काय?
शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात अर्ज करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला व्हेंडर (पुरवठादार कंपनी) निवडण्याची संधी दिली जाते. लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर ठराविक कालावधीत सौर कृषी पंपाची बसवणी केली जाते.
एका महिन्यात पंप देण्याचे आश्वासन
महावितरणकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यात सौर कृषी पंप देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. नियमांनुसार व्हेंडर कंपनीला ६० दिवसांच्या आत पंप बसवणे बंधनकारक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 12:44 PM IST








