तुमच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कसे कमी करायचे? कायदेशीर मार्ग काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विविध कारणांमुळे इतर हक्क नोंदवले जातात. उदाहरणार्थ, जमीन गहाण ठेवणे, शेती करण्याचा अधिकार दुसऱ्याला देणे इ.
मुंबई : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विविध कारणांमुळे इतर हक्क नोंदवले जातात. उदाहरणार्थ, जमीन गहाण ठेवणे, शेती करण्याचा अधिकार दुसऱ्याला देणे, वारसाहक्क किंवा वडिलोपार्जित हक्क, न्यायालयाचा आदेश किंवा कराराद्वारे हक्क निर्माण होणे. मात्र, हे हक्क संपल्यावर त्या नोंदी सातबाऱ्यावरून कमी करण्याची कायदेशीर प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
हक्क कमी करण्यासाठी संमतीपत्र आवश्यक
सातबाऱ्यावरून नावे कमी करण्यासाठी संबंधित हक्कधारकाची लेखी संमती अत्यावश्यक आहे. ही संमती मुद्रांकावर प्रमाणित करून द्यावी लागते. उदाहरणार्थ, कर्ज फेडून झाले असल्यास, कराराचा कालावधी संपल्यास किंवा शेती करण्याचा करार रद्द झाल्यास, जमीनधारक आणि हक्कधारक यांनी स्टॅम्प पेपरवर “हक्क संपले आहेत” असे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे.
advertisement
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
हक्क कमी करण्यासाठी जमीनधारकाने खालील कागदपत्रांसह अर्ज करावा जसे की,
हक्कधारकाचे संमतीपत्र
सध्याचा सातबारा उतारा
८-अ उतारा
स्टॅम्प पेपरवरील करार संपल्याचे लेखन
आधार कार्डाची प्रत
अर्जदाराचा फोटो व सही
advertisement
ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्याकडे सादर करावी लागतात.
चौकशी व मंजुरीची प्रक्रिया
तलाठी अर्ज आणि कागदपत्रे तपासून त्याची नोंद फेरफार प्रकरण म्हणून घेतो. त्यानंतर चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्याकडे अहवाल पाठविला जातो. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मंडल अधिकारी किंवा तहसीलदार फेरफार मंजूर करतात. मंजुरीनंतर सातबाऱ्यावरून संबंधित हक्कधारकांची नावे वगळली जातात आणि नवीन सातबारा उताऱ्यावर त्या नोंदी दिसत नाही.
advertisement
वेळापत्रक आणि मर्यादा
जर सर्व कागदपत्रे पूर्ण असतील आणि प्रकरण न्यायालयीन स्वरूपाचे नसेल तर साधारणतः महिना-दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, न्यायालयीन वाद असलेल्या प्रकरणांमध्ये अधिक वेळ लागू शकतो.
कायदेशीर सल्ला आवश्यक
इतर हक्क कमी करण्याची प्रक्रिया ही अत्यंत गंभीर आणि कायदेशीर स्वरूपाची असल्याने अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या कागदपत्रांमुळे किंवा अपुरी माहितीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो, त्यामुळे सर्व गोष्टी नीट तपासूनच पुढील कारवाई करणे आवश्यक ठरते .
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 1:33 PM IST